Raja Raghuvanshi Murder: मेघालयात मधुचंद्रासाठी गेलेल्या सोनम रघुवंशीने पती राजा रघुवंशीची चोरीच्या प्रयत्नात हत्या झाल्याची दाखवण्यासाठी बनाव आखला होता, जो अपयशी झाला. तसंच तिने हत्येनंतर काही काळ विधवा राहायचं, त्यानंतर कुटुंबाला हत्येचा मास्टरमाइंड आणि आपला प्रियकर राज कुशवाहाशी लग्न करण्यासाठी तयार करायचं अशी योजना आखली होती अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राजा रघुवंशीच्या हत्येचा तपास विशेष तपास पथक करत आहे. सोनमने आपल्या सासूला फोन करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवल्याचं सांगितलं होतं. यावरुन तपास पथकाला संशय आला होता. त्यांनी दोघेही राहत असलेल्या हॉटेल मालकाची चौकशी केली असता, सोनम खोटं बोलत असल्याचं उघड झालं. दोघांनीही तिथे जेवण केलं होतं. यामुळे अधिकाऱ्यांना शंका आली. मेघालय पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता सोनम सतत राजच्या संपर्कात असल्याचं उघड झालं.
पूर्व खासी हिल्सचे पोलिस अधीक्षक विवेक सायम यांनी सांगितलं की, "आम्हाला तिने अन्न खाल्लं होतं हे समजलं. आम्हाला असंही आढळलं की ती मुख्य आरोपी राज कुशवाहाच्या संपर्कात होती. ही घटना चोरी म्हणून दाखविण्याची योजना होती, मात्र ती फेल ठरली".
11 मे रोजी इंदोरमध्ये सोनम आणि राजाचं लग्न झालं होतं. 20 मे रोजी ते दोघे मेघालयला मधुचंद्रासाठी रवाना झाले. 23 मे रोजी दोघे बेपत्ता झाले होते. 2 जूनला राजा रघुवंशीचा मृतदेह मेघायलातील सोहरा परिसरात एका खोल दरीत सापडला. राजाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं असता धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याचं उघड झालं. यानंतर सोनमचा शोध सुरु झाला होता. रविवारी रात्री पोलिसांनी राजला अटक केली. यानंतर सोनमने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं.
मेघालय पोलिसांनी सांगितलं आहे की, सोनमने घरातून निघताना दागिने सोबत घेतले होते. तसंच तिने पतीलाही चोरीचा बनाव रचण्यासाठी महागडे दागिने सोबत नेण्यास तयार केलं होतं.
विवेक सायम म्हणाले, "आमच्या तपासात हे सर्व आढळून आलं आहे. या जोडप्याने परतीच्या विमानाचे तिकीट बुक केलं नव्हतं. सुरुवातीला त्यांनी गुवाहाटीतील एका मंदिराला भेट देण्याची योजना आखली होती. नंतर त्यांनी मेघालयला जाण्याचा निर्णय घेतला. नुकताच येथे एक पर्यटक बेपत्ता झाला होता आणि त्याचा मृतदेह दरीत सापडला असल्याने गुन्हा करण्यासाठी हेच ठिकाण निवडलं असावं. मेघालय ट्रीपचं नियोजन का केलं याचा आम्ही अजूनही तपास करत आहोत".
सोनमने कथितपणे शेअर केलेल्या लोकेशनच्या आधारे राजाच्या हत्येची सुपारी दिलेल्या हल्लेखोरांनी या जोडप्याचा माग काढला. त्यांनी गुवाहाटीमध्ये एक दाओ (माचेट) खरेदी केला होता, ज्याचा वापर करून त्यांनी राजाच्या डोक्याला दोन जखमा केल्या आणि त्याचा मृतदेह दरीत फेकून दिला, असं तपासकर्त्यांनी सांगितलं.
नंतर, मावलाखियात येथील टूर गाईड अल्बर्ट पेडे यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी 23 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास नोंगरियातहून मावलाखियातला 3000 पेक्षा जास्त पायऱ्या चढताना तीन पुरुष पर्यटकांसह या जोडप्याला पाहिलं होतं असं सांगितलं.
हत्येनंतर सोनम मेघालयातून निघून गेली होती. अधिकाऱ्याने सांगितलं की, "तिने पळून जाण्यासाठी ट्रेनचा वापर केला असावा. यासंदर्भात चौकशी सुरू आहे. ती बातम्यांवर लक्ष ठेवून होती. तिच्या पतीने हनिमूनसाठी घेतलेल्या पैशातून ती इतके दिवस राहू शकली. जेव्हा आम्ही इंदूरहून राज कुशवाहाला अटक केली तेव्हा तिने तिचे प्लॅन रद्द केले आणि उत्तर प्रदेशात आत्मसमर्पण केले."
पोलिस आता सोनम शिलाँगमध्ये येण्याची वाट पाहत आहेत, जिथे तिची इतर आरोपींसह चौकशी केली जाईल. कॉन्ट्रॅक्ट किलिंगसाठी पैसे दिले गेले होते की नाही हे पाहण्यासाठी पोलिस त्या काळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहेत.