Rajnath Singh SCO meeting: भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह चीनच्या किगदाओ शहरात पार पडणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले आहेत. या मंचावरुन त्यांनी पाकिस्तान आणि चीनला भारत दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर दहशतवाद आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील भारताची भूमिका कमकुवत करणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नकार दिला, असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दहशतवादाच्या मुद्द्यावर मतभेद असल्याने एससीओने संयुक्त निवेदन जारी न करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एससीओचे अध्यक्षपद भूषवणारा चीन आणि त्यांचा 'सर्वकालीन मित्र' पाकिस्तान यांनी एससीओच्या संयुक्त निवेदनपत्रात दहशतवादापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र राजनाथ सिंह यांनी दहशतवादाबाबत भारताची ठाम भूमिका नोंदवली.
#WATCH | Defence Minister Rajnath Singh met his Russian counterpart, Andrey Belousov, on the sidelines of the SCO (Shanghai Cooperation Organisation) Defence Ministers' meeting in Qingdao, China pic.twitter.com/gJgL18nq3q
— ANI (@ANI) June 26, 2025
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर चीनमधील किंगदाओ येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेत भारत आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री पहिल्यांदाच समोरासमोर आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी बैठकीत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्याशी कोणताही संवाद केला नाही, त्यामुळे तणाव स्पष्ट दिसून आला. या शिखर परिषदेत चीन, रशिया, पाकिस्तान आणि भारतासह संघटनेच्या दहा सदस्य देशांचे संरक्षण नेते एकत्र आले आहेत.
या बैठकीत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासमोर राजनाथ सिंह यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला फटकारलं. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले की, निष्पापांचे रक्त सांडणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. पाकिस्तानचं नाव न घेता ते म्हणाले की, काही देश दहशतवादाला पाठिंबा देतात आणि सीमापार दहशतवादाला त्यांच्या धोरणाचा भाग बनवलं आहे.
India will not hesitate to target epicentres of terrorism: Defence Minister at SCO meet in China
— ANI Digital (@ani_digital) June 26, 2025
Read @ANI Story | https://t.co/kK9198pJ8A#DefenceMinister #RajnathSingh #SCO #China pic.twitter.com/kmJkT2lYIN
"अशा दुटप्पी गोष्टींना स्थान देऊ नये. एससीओने अशा राष्ट्रांवर टीका करण्यास मागेपुढे पाहू नये," असं संरक्षणमंत्र्यांनी कडक शब्दांत सांगितलं.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले की, 22 एप्रिल 2025 रोजी 'द रेझिस्टन्स फ्रंट' नावाच्या दहशतवादी संघटनेने एका नेपाळी नागरिकासह निष्पाप पर्यटकांची हत्या केली. ते म्हणाले की, ही संघटना लष्कर-ए-तैयबाशी जोडलेली आहे, जी आधीच संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी यादीत आहे.
संरक्षणमंत्र्यांनी कट्टरतावाद, दहशतवाद ही आजच्या काळातील सर्वात मोठी आव्हानं असल्याचं सांगितलं आहे. शांतता आणि दहशतवाद एकत्र राहू शकत नाहीत आणि त्यासाठी निर्णायक कारवाई आवश्यक आहे असंही त्यांनी अधोरेखित केलं. त्यांनी सर्व एससीओ देशांना दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचं आवाहन केलं. राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा दुटप्पीपणा आता सहन केला जाऊ शकत नाही. ते म्हणाले की, एससीओने अशा देशांवर उघडपणे टीका करावी आणि दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी.
आपल्या भाषणात ते म्हणाले की, कोणताही देश, कितीही मोठा असला तरी एकटा काम करू शकत नाही. सर्वांना संवाद आणि सहकार्याने एकत्र काम करावं लागेल.