Marathi News> भारत
Advertisement

सोनं तस्करीचा कॉन्ट्रॅक्ट पॅटर्न! अभिनेत्री 30 वेळा दुबईला गेली; एका ट्रीपसाठी घ्यायची 'इतके' लाख

Actress Arrested For Gold Smuggling: विमानतळावर रोखण्यात आल्यानंतर या अभिनेत्रीने आपले वडील डीसीपी असल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र त्यानंतरही तिची तपासणी केली गेली आणि ती अडकली.

सोनं तस्करीचा कॉन्ट्रॅक्ट पॅटर्न! अभिनेत्री 30 वेळा दुबईला गेली; एका ट्रीपसाठी घ्यायची 'इतके' लाख

Actress Arrested For Gold Smuggling: प्रिसद्ध कन्नड अभिनेत्री रान्या रावला बंगळुरुमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) रविवारी संध्याकाळी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. दुबईवरुन एमरिट्सच्या विमानाने आलेल्या रान्याकडे 14.8 किलो सोनं सापडलं आहे. सोनं तस्करी प्रकरणात रान्याला अटक करण्यात आली असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सापडलेल्या सोन्याची किंमत 12 कोटींहून अधिक असून रान्याच्या घरी सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान रान्याच्या प्राथमिक चौकशीमध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच...

पोलीस महासंचालक (पोलीस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची कन्या असलेल्या रान्या ही वडिलांच्या पदाचा फायदा घेत सुरक्षा तपासणी टाळूनच विमानतळाबाहेर निघायची. अशाचप्रकारे ती रविवारी सायंकाळी भारतात दाखल झाल्यानंतर विमानतळाच्या सिक्युरीटी काऊंटवरुन बाहेर पडण्यापासून एक पाऊल दूर असतानाच तिला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तपासासाठी ताब्यात घेतलं. तपासणीदरम्यान रान्याच्या कंबरेला बांधलेल्या बेल्टमध्ये 14.8 किलो सोनं सापडलं. या सोन्याची किंमत 12 कोटी रुपयांहूनही अधिक आहे. रान्याची चौकशी करताना मागील 15 दिवसांमध्ये ती चारवेळा दुबईला जाऊन आली. त्यामुळेच तिच्यावरील संशय बळावला. अधिकाऱ्यांना असलेला संशय खरा ठरला आणि बंगळुरु विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी तस्करीचं एवढं सोनं अधिकाऱ्यांच्या हाती लागलं.

वर्षभरात केल्या 30 दुबई ट्रीप; एका ट्रीपसाठी मिळायचे 13 लाख रुपये

डीआरआयच्या तपासामध्ये रान्या रावने वर्षभरामध्ये 30 वेळा दुबईचा दौरा केल्याचं समोर आलं आहे. या प्रत्येक फेरीला तिने कोट्यवधींचं सोनं तस्करीच्या माध्यमातून देशात आणल्याची शक्यता व्यक्त केली जात असून याचसंदर्भात तपास सुरु आहे, असं 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. रान्या सोनं तस्करी करुन आणण्याचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायची अशी माहितीही समोर आली आहे. एक किलो सोनं तस्करी करुन आणण्यासाठी रान्या 1 लाख रुपये घ्यायची. ती एका ट्रीपमध्ये जवळपास 13 किलो सोनं देशात आणायची. म्हणजेच प्रत्येक ट्रीपसाठी तिला 13 लाख रुपये मिळायचे. मात्र तिच्याकडून तस्करी करुन घेणारे हे तिचे क्लायंट कोण होते हे अद्याप समोर आलेलं नसून सध्या या लोकांबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अडवल्यावर वडील पोलीस असल्याचं सांगितलं अन्...

सोन्याची तस्करी करता यावी म्हणून रान्याने तिचं जॅकेट आणि कंबरेच्या बेल्टमध्ये सोनं लपवता येईल अशी विशेष सोय करुन घेतल्याची माहितीही समोर येत आहे. स्थानिक हवालदार रान्याला अनेकदा सुरक्षा तपासणी टाळण्यासाठी विमानतळावर मदत करायचे अशी माहितीही समोर आली आहे. यावेळेसही सान्याला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर अडवलं असता आपले वडील डीजीपी असल्याचं रान्याने सांगितलं. मात्र त्यानंतरही अधिकाऱ्यांनी आमच्याकडे गुप्त माहिती असून आम्हाला तुमची तपासणी करायची आहे असं सांगितलं आणि तपासणीदरम्यान सान्याचा सोने तस्करीचा प्रयत्न पकडला गेला. 

घरातही सापडलं घबाड

रान्याच्या घरी केलेल्या छापेमारीमध्ये 2.06 कोटींचं सोनं आणि 2.67 कोटी रुपये मूल्याची रोखरक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये एकूण 17 कोटी 29 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

Read More