नवी दिल्ली: दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर चित्ररथांचं सादरीकरण झालं. 26 जानेवारीला पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश होता. यंदा या चित्ररथ सोहळ्यात कोणत्या राज्यानं पहिला मान पटकवला याची उत्सुकता सर्वांनाच असते. त्याचा निकाल नुकताच हाती आला आहे. या चित्ररथ सोहळ्यात राम मंदिराच्या चित्ररथानं पहिला क्रमांक पटकवला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या चित्ररथाला बक्षीस दिलं जाणार आहे. योगी आदित्यनाथ सरकारचं या चित्ररथामुळे खूप कौतुक होत आहे. उत्तर प्रदेशातून यंदा राम मंदिराचा देखावा असलेला चित्ररथ साकारण्यात आला होता. सर्वांच्या नजरा राजपथावर या चित्ररथाकडे खिळल्या होत्या.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्ररथाची यंदा थीम काय असावी यावर प्रत्येक राज्यानं विचार केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मात्र आगळी-वेगळी कल्पना सुचली. काही दिवसांपूर्वी राम मंदिराचं भूमीपूजन पार पडलं. तर राम मंदिराचा चित्ररथच यंदा करावा अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. ही कल्पना सर्वांनाच आवडली आणि साकारही झाली.
जहां अयोध्या सियाराम की
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 26, 2021
देती समता का संदेश..
कला और संस्कृति की धरती
धन्य-धन्य उत्तर प्रदेश... pic.twitter.com/WwPskQHnHn
चित्ररथावर राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याची कल्पना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची होती. राम मंदिर कसं असेल याची उत्सुकता लोकांना आहे. नुकतंच राम मंदिराचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. त्यामुळे आम्ही राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचं ठरवलं ही कल्पना सर्वांना आवडली असंही योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली आहे.
चित्ररथावर राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यासाठी 20 दिवसांचा अवधी लागला. त्यानंतर दिल्लीला रवाना करण्यात आला. या चित्ररथाची सर्वत्र चर्चा होती. राम मंदिर कस असेल याची उत्सुकता देखील सर्वांना होती. अखेर 26 जानेवारीला सर्वांना ही प्रतिकृती चित्ररथाद्वारे पाहता आली. या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे.