Marathi News> भारत
Advertisement

9000 कोटी रुपये, Taxi Driver अन् बँकेच्या एमडींचा थेट राजीनामा... पाहा नेमकं घडलं काय

Rs 9000 Crore Bank MD CEO: बँकेकडून चुकून मोठी रक्कम नको त्या खात्यावर ट्रान्सफर केल्याच्या घटनांबद्दल तुम्ही अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेलच. पण अशाच प्रकारची एक फारच विचित्र घटना समोर आली आहे.

9000 कोटी रुपये, Taxi Driver अन् बँकेच्या एमडींचा थेट राजीनामा... पाहा नेमकं घडलं काय

Rs 9000 Crore Bank MD CEO: बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून होणारा गोंधळ आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात एकाच वेळी मोठी रक्कम नको त्या खात्यावर ट्रान्सफर केल्याच्या घटनांबद्दल आपण अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेल. मात्र अशा प्रकरणांमध्ये अनेकदा बँक कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाते. पण तामिळनाडूमधील एका बँकमध्ये असा प्रकार घडल्यानंतर बँकेच्या निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानेच नैतिक जबाबदारी स्वीकारत स्वत: राजीनामा दिल्याचा प्रकार घडला आहे. तामिळनाडू मर्चेंटाइल बँकेचे कार्यकारी अधिकारी तसेच निर्देश असलेल्या एस. कृष्णन् यांचा राजीनामा सध्या चर्चेत आहे. तामिळनाडू मर्चेंटाइल बँकेने चुकून 9000 कोटी रुपये एका टॅक्सी चालकाच्या खात्यावर ट्रान्सफर केल्याने एकच गोंधळ उडाला. याच गोंधळानंतर एस कृष्णन् यांनी राजीनामा दिला. एस. कृष्णन् यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं असलं तरी त्यांचा बराच कार्यकाळ बाकी असताना हा गोंधळ समोर आल्यानंतर त्यांनी तडकाफडकी राजीनामा देणं हे याच प्रकरणाशी जोडलं जात आहे.

राजीनामा स्वीकारला पण आता आरबीआयच्या निर्देशांची प्रतिक्षा

तामिळनाडू मर्चेंटाइल बँकेने बँकेशी संबंधित सर्व संस्थांना आणि यंत्रणांना एस. कृष्णन् यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची 28 सप्टेंबर रोजी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये हा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. यासंदर्भात देशातील बँकांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही कळवण्यात आलं आहे. एस. कृष्णन् यांनी बँकेची सीईओ आणि एमडी म्हणून सप्टेंबर 2022 रोजी जबाबदारी स्वीकारली होती. सध्या आरबीआयकडून पुढील निर्देश येईपर्यंत एस. कृष्णन् हेच या बँकेचे सीईओ आणि एमडी म्हणून काम पाहतील.

यापूर्वीच्या बँकेने कमवला सर्वाधिक नफा

एस. कृष्णन् हे त्यांच्या नेतृत्व गुणांसाठी ओळखले जातात. तामिळनाडू मर्चेंटाइल बँकेमध्ये रुजू होण्याआधी त्यांनी पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाची जबाबदारी पार पाडली होती. ते 4 सप्टेंबर 2020 ते 31 मे 2022 दरम्यान या पदावर कार्यरत होते. एस. कृष्णन् हे त्यांच्या नेतृत्वाखालीच पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेने आपल्या कारभारामध्ये बरेच सकारात्मक बदल केले होते. डिजीटलायझेशन, रिस्क मॅनेजमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट आणि एचआर या विभागांमध्ये पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेने बरेच बदल केले होते. यामुळे 2021-22 च्या आर्थिक वर्षात पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेने सर्वाधिक नफा मिळवला होता. 

1983 पासून बँकिंग क्षेत्रात कार्यरत

पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेमधील आपल्या या कामगिरी आधी एस. कृष्णन् हे 1 एप्रिल 2020 ते 3 सप्टेंबर 2020 दरम्यान कॅनरा बँकेचे विशेष निर्देशक होते. एस. कृष्णन् यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये जानेवारी 1983 पासून काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा ते इंडियन बँकेत रुजू झाले होते. त्यांनी या बँकेत वेगवेगळ्या पदांवर भूमिका बजावल्या. याच ठिकाणी त्यांनी रिस्क मॅनेजमेंट आणि इन्फोर्मेशन सिस्टीम्स सिक्युरीटीसारख्या गोष्टींचं ज्ञान त्यांनी या ठिकाणी अनुभवातून मिळवलं. बोर्ड ऑफ इंडियन बँक आणि त्याच्याशी संलग्न सर्टिफाइड असोसिएशन ऑफ दर इंडियान इस्टीट्यूट ऑफ बँकर्सचे ते विशेष सचिव सुद्धा होते. आपल्या या कारकिर्दीमध्ये कधीच मोठा गोंधळ न घडल्याने आता 9000 कोटींच्या गोंधळानंतर एस. कृष्णन् यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा बँकिंग क्षेत्रात आहे.

Read More