PM Modi Mohan Bhagwat Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पहलगाम येथील हल्ल्यानंतर आढावा आणि धोरणात्मक बैठकींमध्ये व्यस्त असतानाच मंगळवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांची भेट घेतली. मोहन भागवत हे मोदींची भेट घेण्यासाठी थेट त्यांच्या घरी पोहोचले. पहिल्यांदाच अशाप्रकारे मोहन भागवत पंतप्रधान मोदींच्या सरकारी निवासस्थानी पोहचल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान मोदींबरोबर झालेल्या या भेटीदरम्यान भागवत यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. (दिवसभरातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स अगदी मोजक्या शब्दांमध्ये जाणून घ्या येथे क्लिक करुन.)
सरसंघचालक मोहन भागवत मंगळवारी संध्याकाळी सात वाजून 35 मिनिटांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर जवळपास दीड तासांनी म्हणजेच रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी त्यांनी पंतप्रधान मोदींचे निवासस्थान सोडले. दोघांमधील बैठक सुमारे दीड तास चालली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ला प्रकरणामध्ये सरसंघचालकांनी सरकारला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रत्येक आघाडीवर खंबीरपणे सरकारच्या पाठीशी उभे राहतील असेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव संघप्रमुखांचे स्वागत करण्यासाठी संघ कार्यालय केशव कुंज येथे गेले होते.
नक्की वाचा >> पाकिस्तानवरील हल्ल्याची तयारी पूर्ण? उच्च स्तरीय बैठकीत मोदी म्हणाले, 'हल्ला कधी व कुठे करायचा हे...'
मंगळवारीच पंतप्रधान मोदींनी मोहन भागवत यांची भेट घेण्याआधी उच्च स्तरीय अधिकाऱ्यांबरोबर सुरक्षेसंदर्भातील बैठक घेतली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख पंतप्रधान मोदींबरोबरच्या बैठकीमध्ये हजर होते.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांनी प्राण गमावल्याच्या घटनेनंतर मोहन भागवत यांनी त्याच आठवड्यात झालेल्या कार्यक्रमात एक सूचक विधान केलं होतं. भागवत यांनी मागील आठवड्यामध्ये एका जाहीर कार्यक्रमात, "'धर्मा'नुसार भारताने शत्रूला शिक्षा केली पाहिजे," असं म्हटलं होतं. त्यामुळेच मोहन भागवत यांनी संघाची भूमिका या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींपर्यंत पोहचल्याचं सांगितलं जात आहे.
आज म्हणजेच बुधवारी दिल्लीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 4 महत्वाच्या बैठका होणार आहेत. या बैठकीत पाकिस्तान विरोधातील अॅक्शन प्लानवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता सर्वप्रथम कॅबिनेट सुरक्षा समिती (सीसीएस) बैठक होईल. या बैठकीचे अध्यक्ष पद पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. पहगालमहल्यानंतर ही सीसीएसची दुसरी बैठक आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या अधयक्षतेखाली सीसीपीए म्हणजेच 'कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटीकल अफेर्स'ची बैठक होणार आहे. आज मंत्रिमंडळाची बैठकही पार पडणार आहे.