Earthquake News : रशियामध्ये (Russia earthquake ) आलेल्या 8.8 रिश्टर स्केल इतक्या अतिप्रचंड तीव्रतेच्या भूकंपानंतर (Japan Tsunami) जपानसह कैक देशांमध्ये त्सुनामीचा इशारासुद्धा देण्यात आला आणि या इशाऱ्यानुसार सागरी किनारपट्टी क्षेत्रामध्ये प्रचंड लाटांनी हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळालं. अगदी भारतापर्यंत या भूकंपाच्या संकटाची दहशत पोहोचली असून, वैज्ञानिकांनीसुद्धा हिमालय क्षेत्रात प्रामुख्यानं उत्तराखंड क्षेत्र अतिशय संवेदनशील असल्याचं सांगत सावधगिरीचा इशारा दिला आहे.
मागील 500 वर्षांचा आढावा घेतल्यास (Uttarakhand) उत्तराखंमध्ये मोठा भूकंप आलेला नाही, ज्यामुळं या मोठ्या कालखंडाला शास्त्रीय भाषेत 'सेंट्रल सिस्मिक गॅप' असं संबोधत आहेत. वाडिया इंस्टीट्यूटमधील माजी शास्त्रज्ञ आणि एशियन सिस्मोलॉजिकल कमीशनचे माजी अध्यक्ष डॉ. परमेश बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड, सिक्कीम आणि पूर्वोत्तर भारताला भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे. मागील 500 ते 600 वर्षांमध्ये या क्षेत्रात प्रामुख्यानं उत्तराखंडमध्ये कोणताही भूकंप आलेला नाही. दरम्यान काही अतिशय कमी तीव्रतेची कंपनं मात्र या भागात जाणवली.
शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार पृथ्वीच्या गर्भात निर्माण झालेल्या भूकंपीय उर्जेपैकी अवघी 5 ते 6 टक्के उर्जा बाहेर पडू शकली आहे. त्यातही 'सेंट्रल सिस्मिक गॅप' म्हणजेच कांगडा ते नेपाळ- बिहारच्या सीमेपर्यंतच्या भागामध्ये ही उर्जा अतिशय प्रमाणात असल्या कारणानं हा पूर्ण पट्टा भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये गणला जातो. जिथं अतिप्रचंड तीव्रतेचा भूकंप आल्यास मोठा नुकसानाची शक्यता नाकारता येत नाही.
अभ्यासक आणि जाणकारांच्या मते उत्तराखंडमध्ये सातत्यानं भूगर्भात भूकंपीय उर्जा साठली जात असून, इथं कधी ना कधी 7 ते 8 रिश्टर स्केल इतक्या प्रचंड तीव्रतेचा भूकंप येणं जवळपास निश्चित आहे. मात्र, तो नेमका कधी येईल हे सांगता येणं कठीण आहे. असं असलं तरीही जेव्हा केव्हा हा महाभूकंप येईल तेव्हा उत्तराखंड, सिक्कीम आणि पूर्वोत्तर भारतात हाहाकार माजेल हे नाकारता येत नाही. युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेटमध्ये सतत टक्कर होत असल्या कारणानं हिमालय क्षेत्रात सातत्यानं धरणीकंप सुरू असून, ही क्रिया एका मोठ्या भूकंपामध्ये रुपांतरीत होऊ शकते अथवा त्याच्या शक्यतेत आणखी भर टाकते. सध्या वैज्ञानिक या विषयावर अधिक अध्ययन करत असून, हे संकट येण्यापूर्वीच नागरिकांना नेमकं कसं सतर्क करता येईल त्या अनुषंगानंही विचार करत आहेत.