Air India plane crash in Ahmedabad: अहमदाबादहून इंग्लंडला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून रोजी भीषण अपघात झाला. या विमान अपघाताला तीन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटून गेलेला असतानाच आता या प्रकरणाला वेगळं मिळतंय की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विमान दुर्घटनेचे कटकारस्थान रचल्याचा संशय मोदी सरकारने व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने ब्लॅक बॉक्समधील डेटाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. एएआयबी अर्थात विमान अपघात तपास ब्युरो याप्रकरणी सखोल चौकशी करत असून ब्लॅक बॉक्स भारतात आहे. तो परदेशात पाठवला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ब्लॅक बॉक्समधील माहिती भारतामध्येच तपासी जाणार असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मोहोळ यांनी ही माहिती दिली. अहमदाबाद विमान दुर्घटना ही एक अत्यंत दुर्दैवी घटना होती, असं मोहोळ म्हणाले. एएआयबी प्रत्येक दृष्टीकोनातून त्याची चौकशी करत आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे आणि विविध तपास यंत्रणा एकत्रितपणे तपासात सहभागी आहेत, असेही त्यांनी सांगितले. तपासामध्ये कोणतीही कसर सोडली जाणार असून सविस्त तसेच सर्वांगीन तपास केला जाईल असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
दरम्यान अहमदाबादहून लंडनला जाणारे एआय 171 हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांमध्ये मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळले. या अपघातात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह 270 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातातून केवळ एक प्रवासी वाचला होता. मयत व्यक्तीचे मृतदेह इतके जळाले होते की डीएनए चाचण्यांच्या मदतीने त्यांची ओळख पटवण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांना एअर इंडिया कंपनीची मातृक कंपनी असलेल्या टाटा समुहाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयाची मदत करण्यात आली आहे.
अपघात इंजिनमध्ये बिघाड, इंधन पुरवठ्यातील समस्या की इतर कोणत्या कारणामुळे झाला याबाबतचा तपास सुरु आहे. ब्लॅक बॉक्समध्ये असलेल्या सीव्हीआऱ आणि एफडीआरची तपासणी केली जात आहे.अहवाल 3 महिन्यांत येण्याची अपक्षा आहे, असेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. डीजीसीएच्या आदेशानुसार एअर इंडियाच्या सर्व 33 ड्रीमलायनर विमानांची तपासणी करण्यात आली आहे. सर्व विमाने सुरक्षित असल्याचे आढळले आहे, असा दावाही मोहोळ यांनी केलाय.