Tirumala Tirupati Devasthanams: काही महिन्यांपूर्वी तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीनं भाविकांना प्रसादाच्या स्वरुपात देण्यात येणाऱ्या लाडूसंदर्भातील बऱ्याच वृत्तांनी लक्ष वेधलं होतं. ज्यानंतर आता पुन्हा एकदा या मंदिरातील प्रसादाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असून, थेट सर्वोच्च न्यायालयापुढं मांडण्यात आलेल्या त्यासंदर्भातील याचिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
सोमवारी देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या वतीनं तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात केले जाणारे विधी आणि त्यांच्या नैवेद्य प्रसादामध्ये फक्त आणि फक्त देशी गायीच्याच दुधाचा वापर करावा अशी मागणी करणारी याचिका फेटाळली.
न्यायमूर्ती एमएम सुंद्रेश आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयातून ही याचिका बरखास्त करून त्याऐवजी ती संबंधित उच्च न्यायालयात मांडावी अशा सूचना केल्या. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सुंद्रेश म्हणाले, 'गाय ही गायच असते. इतरांची सेवा करण्यात आणि या सर्व प्रकरणांमध्ये अडकण्यातच देवाप्रतीचं खरं प्रेम वसतं. सध्या समाजात यापेक्षाही महत्त्वाचे विषय आहेत'. आपण केलेलं निरीक्षण हे पूर्ण सन्मानानंच असल्याची बाबही त्यांनी सुनावणीदरम्यान अधोरेखित केले.
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार अगमशास्त्रामध्ये नमूद केल्यानुसार काही महत्त्वाच्या धार्मिक विधींसाठी फक्त देशी गायीच्याच दुधाचा वापर करण्यासंदर्भातील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. खुद्द देवस्थान संस्थानानं यासंदर्भातील प्रस्ताव पुढे केला असून, ही याचिका फक्त त्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसंदर्भात आहे असं याचिकाकर्त्यांचं मत होतं.
'देव हा सर्वांसाठीच एकसमान आहे आणि तो प्रत्येकाशीच तितकाच प्रामाणिक आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की देवाला आता देशी गायीचच दूध हवंय. देवाला काहीतरी वेगळं मिळायला हवं नाही का?' असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय मंदिर संस्थानच्या प्रस्तावासंदर्भात आणि याचिकाकर्त्यांच्या दाव्याला दुजोरा देणाऱ्या एखाद्या कायदेशीर आदेशाची विचारणासुद्धा न्यायालयानं केली. किंबहुना हे संपूर्ण प्रकरण याचिकता श्रेणीत ग्राह्य धरलं जात नसून, याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात त्यासंदर्भात दाद मागावी असं ठळक शब्दांत स्पष्ट केलं. यावेळी, 'आता काय, तिरुपती मंदिरातील लाडूसुद्धा देशी सामग्रीपासूनत बनवायचे का?' असा प्रतिप्रश्नसुद्धा न्यायालयानं उपस्थित केला.