Panchkula Mass Suicide: हरियाणाच्या पंचकुला शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्कमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. बुराडी प्रकरणाप्रमाणेच घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पंचकुला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सामूहिक आत्महत्येचे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उत्तराखंडच्या देहरादून येथील मुळ कुटुंब असून ते काही काळापासून चंदीगड येथे राहत होते.
पंचकूलाच्या सेक्टर 27मध्ये सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका खाली जागेत कार उभी असलेली निदर्शनास आली. पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आल्यानंतर काहीच वेळात पोलिस पोहोचले. पोलिसांनी कारच्या आत वाकून पाहिल्यानंतर तेदेखील सून्न झाले. कारमध्ये मुलं, पुरूष आणि महिला बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. जेव्हा कारचा दरवाजा उघडला आणि त्यांना बाहेर काढण्यात आले तेव्हा कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 12-13 वर्षांच्या दोन मुली, एक 14 वर्षांचा मुलगा आणि त्यांचे आई-वडिल आणि आजी-आजोबांचा समावेश आहे.
कुटुंबातील सातही सदस्यांनी विष खावून आत्महत्या केली होती. कारमध्ये मुलांच्या स्कुलबॅग, खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि अन्य सामानदेखील होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीणच्या कुटुंबावर मोठं कर्ज होतं. त्यांनी टूर अँड ट्रव्हलचा बिझनेस सुरू केला होता. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देहरादूनचा रहिवाशी असलेला प्रवीण मित्तल हे कुटुंबासोबत पंचकूलामधील बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमंत कथेत सहभागी झाले होते. सत्संग संपल्यानंतर ते देहरादूनला परतत होते. तेव्हा वाटेतच त्यांनी सामूहिक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी घटनास्थळावरुन सुसाइड नोटदेखील मिळवली आहे. त्याची तपासणी सध्या सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीपी विक्रम नेहरा यांच्या म्हणण्यानुसार, कारच्या विंडशिल्ड मोठ्या टॉवेलने झाकण्यात आले होते. तेव्हा तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला संशय आला तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी कारमधील सात जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील सहा जणांचा आधीच मृत्यू झाला होता. तर प्रवीण मित्तल हे जिवंत होते. मात्र काहीच वेळात त्यांचादेखील मृत्यू झाला. या प्रकरणाची पोलिस अधिक चौकशी करत आहेत.