Sexual Abuse Killed The Accused: ओडिशातील गजपती जिल्ह्यांत बलात्कारात आरोपी असलेल्या एका 60 वर्षीय व्यक्तीची संपत्प महिलांनीच हत्या करुन मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांना अटक केली असून यात 8 महिलांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला कळलं की त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आले. पोलिसांनी गावापासून जवळपास दोन किमी दूर असलेल्या एका जंगलातील टेकडीवर जळलेल्या अस्थि आणि हाडांची राख सापडली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका वॉर्ड सदस्यसह दहा लोकांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 3 जून रोजी घडली आहे. 3 जूनला रात्री गावातील 52 वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार केला. यानंतर संतप्त महिलांनी बैठक घेऊन आरोपीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. सर्व महिला त्याच्या घरी पोहोचल्या. त्यावेळी तो झोपलेला होता. त्याचवेळी त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले गेले. हत्येनंतर त्याचा मृतदेह जंगलात नेऊन जाळण्यात आला. या घटनेत दोन पुरुषांनीही महिलांना मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कार आरोपीच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या सर्व महिलांवर लैंगिक अत्याचार झाला होता. चार वर्षांपूर्वी आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केला. परंतु, महिलांनी कधीच त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली नव्हती. मात्र आरोपीने विधवा महिलेवर बलात्कार केल्यानंतर महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी बैठक घेऊन आरोपीची हत्या करण्याचा कट रचला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या 8 महिलांपैकी 6 महिलांनी कबुल केले आहे की, त्या व्यक्तीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत आणि हा त्रास कायमचा संपवण्यासाठी त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले आहे.