ज्योतीर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी आता हिंदू धर्माचा भाग नसल्याचं ते म्हणाले आहेत. त्यांनी राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत करत असल्याची घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृती संदर्भात केलेल्या विधानामुळे सनातन धर्मीय नाराज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपल्या आश्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, राहुल गांधींनी संसदेत मनुस्मृती संदर्भात विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या. शंकराचार्य म्हणाले की, राहुल गांधी संसदेत म्हणतात की बलात्काऱ्याला वाचवण्याचं फॉर्म्यूला संविधानात लिहिलेला नाही तर तुमच्या पुस्तकात म्हणजेच मनुस्मृतीत लिहिलेला आहे.
त्यांनी सांगितलं की, राहुल गांधींना तीन महिन्यांपूर्वी एक नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये त्यांना तुम्ही मनुस्मृतीसंदर्भात जो उल्लेख केला आहे तो कुठे आहे अशी विचारणा करत स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली होती. पण इतका काळा लोटल्यानंतरही राहुल गांधींना ना स्पष्टीकरण दिलं आहे, ना माफी मागितली आहे.
शंकराचार्य म्हणाले की, "जेव्हा एखादी व्यक्ती सतत हिंदू धर्मग्रंथांचा अपमान करते आणि स्पष्टीकरण देण्यापासून रोखते तेव्हा त्याला हिंदू धर्मात स्थान देऊ शकत नाही". मंदिरांमध्ये राहुल गांधींचा विरोध झाला पाहिजे असं आवाहनच त्यांनी केलं आहे. तसंच आता त्यांनी स्वत:ला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार हिरावून घेतला असून त्यांना पूजा करण्यापासून रोखा असं पुजाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.
शंकराचार्य यांच्या विधानामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राहुल गांधी याआधीही अनेकदा आपल्या विधानामुळे वादात अडकले आहेत. पण एखाद्या धार्मिक संस्थेकडून त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.