Sharmistha Panoli Arrested: ऑपरेशन सिंदूरशी संबंधित सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपाखाली शर्मिष्ठा पानोलीला कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. शर्मिष्ठा पानोलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये एका विशिष्ट धार्मिक समुदायासाठी अपमानास्पद विधान केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. ऑपरेशन सिंदूरवरील अपडेटला प्रतिसाद म्हणून तिने पोस्ट केली होती. जी आता डिलीट करण्यात आलीय. पण तिचा स्क्रीनशॉट आणि पोस्टमध्ये शेअर केलेला व्हिडिओ वेगाने व्हायरल झालाय. त्यानंतर लोकांमध्ये खूप संताप निर्माण झाला.
कोलकातामधील एका पोलीस ठाण्यात शर्मिष्ठाविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमांखाली शर्मिष्ठाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शर्मिष्ठा पानोलीच्या एका इन्स्टाग्राम व्हिडिओच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्यामुळे एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. तिने बनवलेला कंटेंट भारतीय दंड संहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शर्मिष्ठा पानोली नावाची ही इन्फ्लुएंसर पुण्यातील एका विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतेय. न्यायालयाने तिच्याविरुद्ध वॉरंट जारी केल्यानंतर तिला गुरुग्राम येथून ताब्यात घेण्यात आले. शर्मिष्ठाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले नसल्याचा आरोप केला. या व्हिडिओवर लगेचच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक यूजर्सनी तिच्यावर टीका केली. तर अनेकांनी तिला कमेंट्समध्ये धमकीही दिली.
पोलिसांनी शर्मिष्ठा पानोलीला कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण तिचा आणि तिच्या कुटुंबाचा कोणताही मागमूस सापडला नाही. पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर न्यायालयाने तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. ज्यानंतर पोलिसांनी गुरुग्राममधून तिचा माग काढला आणि अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
14 मे 2025 रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या लष्करी कारवाईबद्दल एका पाकिस्तानी यूजरने प्रश्न विचारला. त्याला उत्तर देण्यासाठी पानोलीने व्हिडीओ शेअर केला आणि घटनेला सुरुवात झाली. व्हिडिओमध्ये त्याने इस्लाम आणि पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. ज्यावर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. संबंधित व्हिडिओमध्ये पानोलीने बॉलिवूड कलाकारांना पाकिस्तानविरुद्ध आवाज न उठवल्याबद्दल टीका केली. व्हिडिओ व्हायरल झाला आणि पानोलीला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या. तिला गंभीर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
नंतर 15 मे रोजी पानोलीने एक्स वर माफी मागितली. 'मी बिनशर्त माफी मागते, जे काही लिहिले आहे ते माझ्या वैयक्तिक भावना आहेत आणि मी कधीही जाणूनबुजून कोणालाही दुखावू इच्छित नव्हते, असे शर्मिष्ठा म्हणाली. जर कोणी दुखावले गेले असेल तर मला त्याबद्दल माफी मागते. आतापासून मी माझ्या सार्वजनिक पोस्टमध्ये सावध राहीन. माझी माफी पुन्हा स्वीकारा, अशी विनंती तिने केली. यानंतर पानोलीने मूळ व्हिडिओ हटवला. माझा व्हिडीओ 'कट्टरपंथी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या' धमक्यांना प्रतिसाद होत्या. माझ्यासाठी माझा देश प्रथम येतो, असे तिने सांगितले. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे नेते वारिस पठाण यांनी जाहीरपणे तिच्या अटकेची मागणी केली तेव्हा हे प्रकरण आणखी वाढले. 'कोणताही मुस्लिम आपल्या पैगंबराबद्दल अपमानास्पद शब्द सहन करणार नाही,' असे ते म्हणाले होते.