Teacher Arrested Affair With Students Father: विद्यार्थिनीच्या वडिलांशी अफेअर करत एका तरुण शिक्षिकेने लाखोंची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या 25 वर्षीय शिक्षिकेने सदर इसमाला ब्लॅकमेल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बंगळुरु पोलिसांनी अटक केलेल्या तरुण शिक्षिकेचं नाव श्रीदेवी रुदागी असं आहे. श्रीदेवीबरोबरच तिच्या दोन सहकाऱ्यांचा या कटात सहभाग होता. या दोघांनाही पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवी रुदागीसह आम्ही तिचे दोन साथीदार गणेश काळे आणि सागर मोरे या दोघांना चार लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामधील पीडित व्यक्ती हा बंगळुरुमधील एक नामांकित व्यापारी आहे. बंगळुरु पश्चिम येथे हा व्यापारी पत्नी आणि तीन मुलींसह राहतो. त्याने 2023 मध्ये त्याच्या 5 वर्षांच्या मुलीचा शाळेत प्रवेश घेतला. मुलीचा शाळेत दाखला करताना या व्यापाऱ्याची भेट श्रीदेवी रुदागी नावाच्या शिक्षिकेबरोबर झाली. त्यानंतर श्रीदेवी रुदागी सातत्याने या व्यापाऱ्याच्या संपर्कात राहू लागली. वेगवेगळ्या फोनवरुन या व्यापाऱ्याशी श्रीदेवी संपर्क साधू लागली. ती अनेकदा समोरुन या व्यापाऱ्याला व्हिडीओ कॉल करु लागली. यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांची जवळीक वाढल्यानंतर श्रीदेवीने या व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये उकळले. त्यानंतर जानेवारी महिन्यात 15 लाख रुपयांची मागणी केली. श्रीदेवी रुदागी तिच्या विद्यार्थिनीच्या वडिलांना फोटो आणि व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करत होती.
व्यापाऱ्याने सुरुवातीला श्रीदेवीला 4 लाख रुपये दिले. मात्र तिने पुन्हा मागणी केल्यानंतर या व्यापाऱ्याने 15 लाखांची रक्कम देण्यास नकार दिला. यानंतर श्रीदेवीने मला 50 हजार उधार हवेत असा बहाणा केला आणि ती थेट त्याच्या घरी पोहोचली. या व्यापाराने आर्थिक चणचण निर्माण झाल्याने त्याने कुटुंबाला घेऊन गुजरातला परतण्याचा निर्णय घेतला. मात्र मुलींचा दाखला दुसऱ्या शाळेत करायचा म्हणजे मुलीचं ट्रान्सफर सर्टिफिकेट आवश्यक होतं.
मुलीचं ट्रान्सफर सर्टिफिकेट घेण्यासाठी व्यापारी मुलीच्या शाळेत गेला. तिथे श्रीदेवी रुदागी, गणेश काळे आणि सागर हे तिघेही होते. या सगळ्यांनी या व्यापाऱ्याला श्रीदेवीबरोबरचे खासगी फोटो आणि व्हिडीओ दाखवले आणि ब्लॅकमेल करत 20 लाख रुपयांची मागणी केली. 20 लाख रुपये दिले नाहीस तर तुझ्या कुटुंबाला तुझे हे फोटो आम्ही दाखवू अशी धमकीही दिली.
या व्यापाऱ्याने मग या तिघांनाही सगळी परिस्थिती सांगितली. तरीही या तिघांनी त्याचं काही ऐकून घेतलं नाही. अखेर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर शेवटी 15 लाख रुपये द्यायचे आणि प्रकरण मिटवायचं असं या चौघांचं ठरलं. त्यापैकी 1 लाख 90 हजार रुपये व्यापाऱ्याकडून आधी देण्यात आले. मात्र नंतर श्रीदेवीच्या मागण्या वाढतच गेल्या. 17 मार्च 2025 ला श्रीदेवीने सदर व्यापाऱ्याला फोन करुन, "मला 5 लाख रुपये हवे आहेत. तसेच माजी पोलीस अधिकाऱ्याला प्रत्येकी एक लाख रुपये आणि गणेश काळे आणि सागरला 8 लाख रुपये हवे असून माझे पैसे पाठवून दे," असं सांगितलं.
सातत्याच्या या आर्थिक मागण्या आणि छळाला कंटाळून शेवटी व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणात श्रीदेवीसह तिच्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.