IndiGo Engine Fail News: अहमदाबाद विमान दुर्घटनेनं संपूर्ण देश हादरला असताना त्या दिवसापासूनच विमान प्रवासाशी संबंधित अनेक धक्कादायक वृत्त पाहायला मिळाली. त्यातच नुकताच अगदी अमदाबादसारखाच अपहात होता होता राहिला. दिल्लीहून गोव्याला निघालेल्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं या आपात्कालीन परिस्थितीमध्ये वैमानिकानं ते मुंबई विमानतळावर उतरवलं. सूत्रांच्या माहितीनुसार वैमानिकानं 16 जुलै 2025 रोजी रात्री 9 वाजून 25 मिनिटांनी अलार्म वाजवला आणि काहीतरी चुकतंय याची चुणूक प्रवाशाना झाली, ते सतर्क झाले पण, धडकी भरताच अनेकाच्या काळजाचं पाणी झालं.
9 वाजून 42 मिनिटांनी वैमानिकानं आपात्कालीन परिस्थितीमध्ये हे विमान मुंबईत उतरवलं. मात्र दरम्यानच्या 17 मिनिटांच्या वेळात ते आकाशातच घिरट्या घालत राहिलं. प्राथमिक माहितीनुसार उड्डाणानंतर काही क्षणातच इंडिगोच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची बाब लक्षात आली, त्यावेळी विमान मुंबईनजीकच्या हवाई क्षेत्रात होतं.
वैमानिकानं रात्री 9 वाजून 25 मिनिटांनी हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) विभागाला यासंदर्भाती सूचना देत मुंबई विमानतळावर विमान उतरवण्यासाठीची परवानगी मागितली. सदर माहिती मिळताच मुंबई विमानतळावर एकच गोंधळ माजला आणि विमानाला तातडीनं धावपट्टीवर उतरवण्याची परवानगी देत लँडिंग क्लिअरन्स देण्यात आला आणि रात्री साधारण 9.42 वाजता विमान सुरक्षितरित्या मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं आणि त्यातील प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. ज्यानंतर विमानाला सुरक्षित ठिकाणी नेत त्याच्या इंजिनाची पाहणी आणि तपासणी करण्यात आली.
A technical snag was detected on flight 6E 6271 while flying from Delhi to Manohar International Airport, Goa. Following procedures, the aircraft was diverted and landed at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai. While the aircraft will undergo necessary checks… pic.twitter.com/WobeXSXRSh
— ANI (@ANI) July 16, 2025
दिल्ली ते गोवा प्रवासासाठी असणाऱ्या विमानाक बिघाड झाल्यानंतर इंडिगोच्या प्रवक्त्यांकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देत प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची सोय करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. इंडिगोने फ्लाइट 6E 6271 संदर्भात अधिकृत माहितीपत्कर जारी करत म्हटलं,'दिल्लीहून गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या फ्लाइट 6E 6271 मध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड आढळून आला. सुरक्षा उपायांच्या अनुषंगाने, विमानाला वळवण्यात आलं आणि ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे सुरक्षित उतरवण्यात आलं. विमानाची तांत्रिक तपासणी आणि देखभाल पूर्ण होईपर्यंत ते सेवाबाह्य ठेवण्यात येईल.' अतिशय अनपेक्षित प्रसंगामुळं प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल इंडिगोने खंतही व्यक्त केली.