Women Employment : बोर्डाच्या परीक्षा असो किंवा अगदी स्पर्धा परीक्षा. अनेकदा या परीक्षामध्ये आघाडीच्या क्रमांकांवर कायमच मुलींची नावं पुढे असतात. त्यामुळं कित्येकदा तर, 'मुलींनी मारली बाजी...' याच मथळ्याखाली दिसणारं वृत्त सवयीचं होऊन जातं. कैक वर्षांपूर्वीपासूनची आव्हानं झुगारून या आव्हानांच्या नाकावर टिच्चून महिला शिक्षणासाठी आणि महिलांच्या विकासासाठी झटणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्नांना आता कुठे खऱ्या अर्थानं यश मिळताना दिसलं.
मात्र देश कितीही पुढे गेला असला तरी सुद्धा महिलांच्या प्रगतीपथावर असणारे आव्हानरुपी काटे काही संपले नाहीत हे नुकतीच समोर आलेली आकडेवारी सांगून जात आहे. देशात मुली अभ्यासात मुलांपेक्षा कायम पुढे, पण नोकऱ्या मिळवण्यात मात्र त्या मागे पडतात असं पिरिऑडिक लेबर फोर्स सर्व्हे-पीएलएफएसच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झालं असून लिंग निर्देशांकात भारत 131 व्या स्थानी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
फक्त शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणच नव्हे, तर उच्च शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा मुलींनी मुलांना मागे टाकलं असूनही आणि त्यांचं एकूण नोंदणी प्रमाण (GER) मुलांपेक्षा चांगलं आहे. मात्र असं असतानाही पुढं करिअरच्या दृष्टीनं पावलं टाकत असताना महिलांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळू शकत नाहीत ही बाब मात्र दुर्दैवी. नोकरी क्षेत्र किंवा कामगार बाजारात प्रवेश करताना मुलींना अनेकदा पद्धतशीरपणे निर्माण केलेल्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं आणि या अडचणी कोणालाही चुकलेल्या नाहीत.
सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार कायमस्वरूपी रोजगारात महिलांचा वाटा कमी असून 2018-19 मध्ये पगारदार नोकऱ्यांमध्ये महिलांचा वाटा 22% इतका होता. 2023-24 मध्ये हाच वाटा 16% हून कमी झाला. एकूण काम करणाऱ्यांमध्ये स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांचा वाटा एकूण काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेक 67.4% पर्यंत वाढला, जो 2017-18 मध्ये हा आकडा फक्त 51.9% इतकाच होता.
महिला जेव्हा मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वयंरोजगारात पाऊल ठेवतात तेव्हा त्यांना पुरुषांपेक्षा जास्त आर्थिक किंमत मोजावी लागते हीच वस्तूस्थिती. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे शहरी भागात, 2023-24 या वर्षात पगार घेणाऱ्या आणि स्वयंरोजगार करणाऱ्या पुरुषांच्या पदारात 11 टक्क्यांचा फरक होता. मात्र महिलांसाठी हाच फरकाचा आकडा 132 टक्के इतका मोठा होता. ज्यामुळं काळ कितीही पुढे आला असला तरीही नोकरी किंवा स्वयंरोजगारासारख्या क्षेत्रांमध्ये महिलांना आजही कैक आव्हानांचा सामना करावा लागतो हीच बाब नाकारता येत नाही.