MP High Court : कंडोमच्या जाहिरीतीमध्ये गरबा (garba)खेळताना दाखवणे हे भावना दुखावणारे नसल्याचा निर्वाळा मध्य प्रदेश हायकोर्टाने दिला आहे. पारंपरिक गुजराती नृत्य प्रकार 'गरबा' करत असलेले जोडपे दाखवणाऱ्या कंडोमच्या जाहिरातीमध्ये (condom ad) अश्लीलता नाही, असा निकाल कोर्टाने दिला आहे. यासोबत हाय कोर्टाने नुकतीच सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर यासंदर्भातील जाहिरात पोस्ट केल्याबद्दल फार्मासिस्ट कंपनीच्या प्रमुखाविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा देखील रद्द केला आहे.
मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्यायाधिश सत्येंद्र कुमार सिंह यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जाहिरातीचा उद्देश हा फक्त उत्पादनाची जाहिरात करणे आहे. त्याव्यतिरिक्त कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा (Religious Sentiments) हेतू या जाहिरीतमध्ये नाही असे हायकोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणी महेंद्र त्रिपाठी यांच्याविरोधात भादंवि कलम 505, 295ए आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात त्रिपाठी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
नेमकं प्रकरण काय?
2018 साली ऑक्टोबरमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान जोडप्यांसाठी मॉर्फस फार्मास्युटिकल्स प्रा. लिमीटेड या फार्मा कंपनीचे मालक महेंद्र त्रिपाठी यांनी मोफत कंडोम आणि गर्भाधरणा चाचणी किटची जाहिरात सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या जाहिरातीमध्ये त्रिपाठी यांनी गरबा खेळणारे जोडपे दाखवले होते. ही जाहिरात त्रिपाठी यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर आणि फेसबुकवरही पोस्ट केली होती. 'प्री लव्हरात्री वीकेंड ऑफर – कंडोम (३ चा पॅक)/प्रेग्नन्सी टेस्ट किट' असे या जाहिरातीमध्ये म्हटले होते.
6 ऑक्टोबर 2018 ते 7 ऑक्टोबर 2018 पर्यंत कंपनी मोफत कंडोम पॅक आणि प्रेग्नेंसी किट देत असल्याचे लोकांना कळवण्याचा स्पष्ट हेतू या जाहिरातीचा होता. मात्र अजय नावाच्या व्यक्तीने या जाहिरातीमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याची लेखी तक्रार पोलिसांकडे केली होती. यानंतर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कंपनीच्या वकिलांनी न्यायालयासमोर अर्जदार फार्मसीचा व्यवसाय करत असल्याने त्यांनी नवरात्रीच्या काळात जाहिरातीत गरब्याची प्रतिमा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सद्भावनेने वापरली होती, अशी बाजू मांडली. दुसरीकडे, दुसऱ्या बाजूच्या वकिलांनी या पोस्ट केलेल्या फोटोतील मजकूरामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. नवरात्रीच्या काळात या प्रकारच्या जाहिरातीतूनच अर्जदाराचा गुन्हेगारी हेतू दिसून येतो. त्यामुळे त्याला कोणताही दिलासा देऊ नये, असे म्हटले होते.
Condom ad featuring couple playing Garba is not obscene, does not hurt religious sentiments: Madhya Pradesh High Court
— Bar & Bench (@barandbench) December 28, 2022
report by @NarsiBenwal https://t.co/JKWH0sRPDo
हायकोर्टाने काय म्हटलं?
अर्जदार इंदूर येथे फार्मसीचा व्यवसायी आहे. तो स्वत: हिंदू समाजाचा आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, तसेच त्याने आपली ओळख न लपवता आपला मोबाईल फोन वापरला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, त्याच्याकडून असा हेतू दर्शवणाऱ्या या पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणताही पुरावा नसल्याचे कोर्टाने म्हटलं आहे. त्यांचा हेतू फक्त त्यांच्या कंपनीच्या उत्पादनाची जाहिरात करणे आणि कोणत्याही समुदायाच्या धार्मिक भावना आणि भावना दुखावण्याचा नव्हता, असेही हायकोर्टाने म्हटलं.
"याचिकाकर्ता स्वतः हिंदू समाजाचा आहे हे लक्षात घेऊन आणि त्याने आपली ओळख न लपवता आपल्या मोबाईल नंबरवरून हे फोटो पोस्ट केले आहेत. त्याचा हेतू फक्त आपल्या कंपनीच्या उत्पादनाची जाहिरात करण्याचा होता असे दिसते. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावू नये असाच त्याचा हेतू होता," असे कोर्टाने म्हटलं.