Shubhanshu Shukla Axiom 4 Mission Live: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी 25 जून 2025 रोजी बरोबर 12 वाजता आवकाशात झेप घेतली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताच्या शुंभाशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांना अॅक्झिओम-4 मोहिमेचे आज बुधवारी उड्डाण झाले. नासानेच याबाबतची घोषणा केली आहे. या पूर्वी ही मोहिम अनेकदा लांबणीवर पडली होती. मात्र आज अॅक्झिओम मोहिमेचे प्रक्षेपण पार पडतं आहे. 3 एप्रिल 1984 रोजी भारताचे आंतराळवीर राकेश शर्मा यांनी सोविएत संघाच्या मदतीने अंतराळात पाऊल ठेवले होते. त्यानंतर आता 41 वर्षांनंतर शुभांशू शुक्ला यांची निवड झाली आहे. शुभांशू हे लखनौचे रहिवासी असून एअरफोर्सवर ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत आहे. 1 वर्षांच्या कठोर ट्रेनिंगनंतर त्यांची स्पेस मिशनसाठी निवड झाली होती.
स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटने ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून हे अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले आहे. शुभांशू शुक्ला यांच्यासोबत या मोहिमेचे नेतृत्व कमांडर पॅगी व्हिटसन या करत आहेत. तसंच, हंगेरीचा अंतराळवीर टिबोर कपू आणि पोलंडचा स्लोव्होज उडनास्की विस्निव्हस्की तज्ज्ञ म्हणून असतील. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, या मिशनची पहिली 15 मिनिटे महत्त्वाची असणार आहे. स्पेसएक्स रॉकेटच्या माध्यमातून हे स्पेस मिशन 14 दिवसांचे असणार आहे. शुभांशू ISROच्या काही डिझाइनवरही अंतराळात संशोधन करणार आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, इस्रो शुभांशु शुक्ला यांच्या एक्सिओम-4 मिशनसाठी 550 कोटींचा खर्च करत आहे. मात्र 1954 साली जेव्हा राकेश शर्मा अंतराळात गेले होते तेव्हा भारताकडून अधिक खर्च करण्यात आला नव्हता. सोवियत संघाने त्या स्पेस मिशनची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती.
शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सात प्रकारचे प्रयोग करणार आहेत. यामध्ये अंतराळ स्थानकाच्या आत भारतीय सूक्ष्म गुरुत्वाकर्षण प्रयोगांचा समावेश आहे. शरीराचे स्नायू अंतराळात स्वतःची दुरुस्ती करण्यास सक्षम आहेत की नाही. तिथे कडधान्यांना अंकुर कसे फुटतात? अंतराळात जीवाणूंवर काय परिणाम होतो? तसंच अंतराळात भात, वांगी आणि टोमॅटोच्या बियाण्यांच्या विकासावरही संशोधन करतील.