एक डॉक्टर जोडपे त्यांच्या तीन मुलांसह ब्रिटनमध्ये स्थायिक होणार होते. पण आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यापूर्वीच या जोशी कुटुंबाच स्वप्न भंगलं. 5 जणांच्या या सुंदर कुटुंबासाठी एक विमान प्रवास हा शेवटचा प्रवास ठरला. लंडनला जाणाऱ्या विमानात या कुटुंबाने एक गोंडस सेल्फी काढला. अपघातानंतर, हे कुटुंब आता या जगात नाही, परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणारा त्यांचा शेवटचा सेल्फी हृदयाला हादरवून टाकणारा आहे.
राजस्थानमधील बांसवाडा येथील एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या पॅथॉलॉजिस्ट डॉ. कोनी यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या पदाचा राजीनामा दिला जेणेकरून त्या त्यांचे पती प्रतीक जोशी, जे लंडनमधील डॉक्टर आहेत आणि त्यांच्या तीन मुलांसह - पाच वर्षांची जुळी मुले प्रद्युत आणि नकुल आणि आठ वर्षांची मुलगी मिराया यांच्यासोबत नवीन जीवन सुरू करू शकतील. विमान उड्डाण करण्यापूर्वी, या कुटुंबाने एक सेल्फी काढला. एका बाजूला हसणारे पालक आणि दुसरीकडे मुले. पण हा सेल्फी काढल्यानंतर काही मिनिटांतच सर्व काही बदलले अन् होत्याचं नव्हतं झालं. पाचही जणांनी जगाला कायमचा निरोप दिला.
डॉक्टर दाम्पत्य आणि त्यांची तीन लहान मुले ज्या एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करत होते, त्या विमानाने गुरुवारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले आणि ३२ सेकंदांसाठी हवेतच राहिले. पण त्यानंतर ते खाली कोसळू लागले आणि इमारतीवर आदळल्यानंतर त्याचे आगडोंबात रूपांतर झाले. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी एक वगळता सर्वांचा मृत्यू झाला आणि जमिनीवर असलेले अनेक जण ठार झाले.
डॉ. जोशी काही काळापूर्वी लंडनला गेले होते आणि या आठवड्याच्या सुरुवातीला राजस्थानमधील बांसवाडा येथे त्यांच्या कुटुंबाला घेऊन जाण्यासाठी आले होते. डॉ. जोशी यांचे चुलत भाऊ नयन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ते काल लंडनला जाणारी फ्लाइट पकडण्यासाठी अहमदाबादला निघाले होते. प्रतीक दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि मुलांना सोबत घेऊन जाण्यासाठी येथे आला होता. दोन्ही कुटुंबातील इतर अनेक सदस्य त्यांना निरोप देण्यासाठी गेले होते."
आता सर्वांना त्यांचा शेवटचा सेल्फी आठवत आहे. त्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. हा शेवटचा सेल्फी म्हणजे नशिबाच्या क्रूर हातांनी त्यांना हिरावून घेण्यापूर्वी त्यांनी एकत्र जगलेल्या सुंदर पण लहान असा क्षण होता.