Sonam Raghuwanshi Arrest News: देशभरामध्ये चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर बेपत्ता असलेली त्याची पत्नी सोनम रघुवंशी सापडली आहे. लग्नानंतर हनिमूनसाठी मेघालयाला गेलेल्या या जोडप्यापैकी नवऱ्याचा मृतदेह 2 जून रोजी एका धबधब्याजवळ सापडला होता. तेव्हापासून बेपत्ता असलेली सोनम सात दिवसांनंतर सापडली असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. सोनमला उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, दुसरीकडे मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी राजाच्या हत्येमध्ये सोनमचा हात होता असं म्हटलं आहे. 'झी न्यूज'ला दिलेल्या माहितीनुसार, सोनमनेच पतीच्या हत्येची सुपारी दिली होती अशी माहिती डिजीपींनी दिली आहे.
मागील सात दिवसांपासून सोनम नेमकी कुठे होती? ती काय करत होती? राजाची हत्या का करण्यात आली? यामध्ये सोनमला कोणीकोणी मदत केली? यासंदर्भातील तपास आता पोलीस करत आहेत. तर दुसरीकडे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड कोंगकल संगमा यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच एका महिलेने समर्पण केलं असून एका आरोपीचा शोध सुरु असल्याचंही सांगितलं आहे. मध्य प्रदेशमधील तिघांना अटक करण्यात आली असून हे तिघेच हल्लेखोर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील बरीच रहस्य उलगडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Within 7 days a major breakthrough has been achieved by the #meghalayapolice in the Raja murder case … 3 assailants who are from Madhya Pradesh have been arrested, female has surrendered and operation still on to catch 1 more assailant .. well done #meghalayapolice
— Conrad K Sangma (@SangmaConrad) June 9, 2025
मागील 7 दिवसांपासून सोनम बेपत्ता होती. सोनमला आज पहाटे गाजीपूरमधील एका ढाब्यावरुन अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आल्यानंतर सोनमने पोलिसांसमोरच तिच्या कुटुंबियांशी संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस सोनमला रुग्णालयात घेऊन गेले आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर तिला कोर्टासमोर हजर केलं जाईल असं सांगितलं जात आहे. या प्रकरणात सोनमसहीत एकूण चार लोकांचा समावेश असून सोनम आणि इतर तिघांना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीचा शोध सुरु आहे.