225 Crores Lottery To Indian Man: कोणाचं नशीब कसं फळफळेल सांगता येत नाही, असं म्हणतात. असाच प्रत्यय संयुक्त सौदी अरेबियामध्ये मागील 20 वर्षांपासून नोकरी करणाऱ्या एका भारतीय इंजिनिअरला आला आहे. खरं म्हणजे हा इंजिनिअर निवृत्त होऊन भारतात परतल्यानंतर त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुखद धक्का मिळाला आहे. सौदी अरेबियामध्ये दोन दशकं काम केल्यानंतर निवृत्त झाल्यावर देश सोडण्यापूर्वी या व्यक्तीने डोळे बंद करुन लॉटरीचं तिकीट निवडलं आणि तो मायदेशी कायमचा परतला. मात्र आता ही लॉटरी या व्यक्तीला लागल्याचं लॉटरी कंपनीने जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे बक्षिसाच्या रक्कमेचा विचार केला तर ही परदेशात कोणत्याही भारतीयाला लागलेल्या सर्वात मोठ्या लॉटरीपैकी एक आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या भारतीयाने डोळे बंद करुन निवडलेल्या नंबरवरुन तब्बल 225 कोटी रुपये जिंकले आहेत.
ज्या भारतीयाला ही लॉटरी लागली आहे त्याचं नाव श्रीराम राजगोपालन असं आहे. श्रीराम हे मूळचे चेन्नईचे आहेत. त्यांना 100 मिलियन द्राम्स म्हणजेच 225 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. 'इमिरिट्स ड्रॉ मेगा 7' असं श्रीराम यांना एका रात्रीत कोट्याधीश करणाऱ्या लॉटरीचं नाव आहे. मंगळवारी या लॉटरीच्या विजेत्याची जाहीर घोषणा कंपनीने केली. देश सोडण्यापूर्वी आपलं नशीब आजमावून पाहूयात असा विचार करुन श्रीराम यांनी लॉटरीची सोडत काढली होती.
लॉटरी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 16 मार्च रोजी विक्री करण्यात आलेल्या तिकीटाचा श्रीराम यांनी निवडलेला नंबर हा विजेता नंबर ठरला आहे. 'इमिरिट्स ड्रॉ' नावाच्या कंपनीने जारी केलेल्या पत्रकामध्ये श्रीराम यांनी डोळे बंद करुन क्रमांक निवडला होता असंही म्हटलं आहे. "श्रीराम यांनी त्यांच्या फोनवर डोळे बंद करुन स्टायलच्या मदतीने वाटेल ते आकडे निवडले होते," असं कंपनीने म्हटलं आहे.
"मी निकाल पाहिला तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. मी पुन्हा तो व्हिडीओ प्ले करुन पाहिला. विजेता नंबर स्क्रीनवर झळकत होता तेव्हा मी पुरावा म्हणून स्क्रीनशॉटही काढून ठेवला," असं श्रीराम यांनी 'खलीज टाइम्स'ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे.
Sriram Rajagopalan tapped his numbers with his eyes closed. What happened next made history.
— Emirates Draw (@emiratesdraw) May 25, 2025
Will your numbers be next?
Buy your #EDMEGA7 tickets at https://t.co/mix9Q5J1pN. #EmiratesDraw #Global #ForABetterTomorrow #Millionaire pic.twitter.com/bVo6cZDnp7
हा सारा प्रकार म्हणजे '70 टक्के आनंद आणि 30 टक्के भिती' असा असल्याचं श्रीराम यांनी म्हटलं आहे. "ही फारच मोठी रक्कम असून याबद्दल मी कधी विचारही केला नव्हता. मात्र हा पैसा केवळ माझ्यासाठी नाही. हा पैसा माझ्या कुटुंबासाठी एक आशेचा किरण आहे. माझ्या मुलांसाठी आणि सर्वांसाठी हे फार आशायादी आहे. प्रत्येक बापाला त्याच्या मुलांचं भविष्य सुरक्षित असावं असं वाटतं. आता मला तसं वाटतंय. अनेक पिढ्यांना पुरेल एवढं धन यामधून निर्माण करता येईल अशी संधी या लॉटरीच्यानिमित्ताने आम्हाला मिळाली आहे," असं म्हणत श्रीराम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.