Factory Worker Shrawan Kumar Cracked NEET UG 2025: जेव्हा काहीतरी चांगले साध्य करण्याची जिद्द असते तेव्हा माणूस प्रत्येक कठीण परिस्थितीशी झुंजतो. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे राजस्थानचा श्रवण कुमार. त्याने नुकत्याच जाहीर झालेल्या NEET UG निकाल 2025 मध्ये आपली वैद्यकीय जागा निश्चित केलीय. श्रवण हा अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून पुढे आलाय. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना त्याला अनेक अडचणी आल्या. श्रवण कुमारच्या आईवडिलांना उदरनिर्वाहासाठी लोकांच्या घरात भांडी धुवावी लागतात. घराचा आर्थिक भार कमी करण्यासाठी श्रवणदेखील काम करतो. अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असूनही त्याने इतकी मोठी कामगिरी केलीय.
श्रवण कुमार हा राजस्थानातील बालोत्रा येथील खातू गावात लहानाचा मोठा झाला. 19 वर्षाच्या श्रवण कुमारने NEET 2025 मध्ये यश मिळवल्याने संपूर्ण जिल्ह्यातून त्याचं कौतुक होतंय. विशेष म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत त्याने हे स्थान मिळवले आहे. कारखान्यात काम करताना श्रवण कुमारला त्याच्या यशाची बातमी मिळाली. श्रवणच्या यशामुळे त्याचे गाव आणि कुटुंबाचा उर अभिमानाने भरुन आलाय. सरकारी शाळेतून शिक्षण घेतलेल्या श्रवणला दहावीत 97 टक्के आणि बारावीत 88 टक्के गुण मिळाले होते.
श्रवण एका कारखान्यात काम करतो आणि त्याचे पालक गावातील कार्यक्रमांमध्ये भांडी धुवून उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणी असूनही त्याने ओबीसी श्रेणीत 4071 क्रमांक मिळवला आहे. यामुळे त्याला राजस्थानमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जागा मिळण्याची शक्यता आहे.
श्रवणने बारावीनंतरच्या करिअरचा कधीही विचार केला नव्हता. पण 2022 च्या अखेरीस त्याच्या घरी वीज आली. सरकारी योजनेअंतर्गत त्याच्या आईला मोफत स्मार्टफोन आणि इंटरनेट मिळाले. यामुळे श्रवणला अभ्यासासाठी अधिक वेळ मिळाला आणि त्याला ऑनलाइन संधींबद्दल माहिती मिळाली. बाडमेरमधील सरकारी डॉक्टरांकडून मोफत NEET कोचिंगमुळे त्याला त्याच्या तयारीत मदत झाली.
श्रवणच्या यशानंतर, शेजारी, मीडिया आणि गावातील प्रतिष्ठित लोकं त्याच्या घरी येतायत. ते श्रवणच्या दृढनिश्चयाचे आणि कठोर परिश्रमाचे कौतुक करतायत. 'लोक माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत फोटो काढतायत. हा एक अभिमानाचा क्षण आहे', असे श्रवण सांगतो. आज श्रवणला त्याचे जुने दिवस आठवतायत. जेव्हा तो त्याच्या वडिलांसोबत भांडी घासायचा आणि गुरांची काळजी घ्यायचा.
श्रवण आता डॉक्टर बनून त्याच्यासारख्या मागासलेल्या गावांची सेवा करू इच्छितो. या गावांमध्ये वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध नाहीत आणि भाषेच्या अडचणी देखील आहेत. इथे ड्युटी करणाऱ्या डॉक्टरांना आमची मारवाडी बोली समजत नाही. मला हे बदलायचंय, असे श्रवण सांगतो. डॉक्टर बनून लोकांची सेवा करावी हे श्रवण कुमारचे स्वप्न आहे. ज्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे पण ती मिळू शकत नाही त्यांना तो मदत करू इच्छितो.
सर्वप्रथम तू काय बदलशील? असे त्याला विचारले असता तो संकोच न करता म्हणाला, 'मला माझ्या वडिलांना भांडी धुण्यापासून आराम द्यायचाय. एकदा मी कमाई करायला सुरुवात केली की, मी एक छान घर बांधेन आणि मला असे वाटते की त्यांना पुन्हा कधीही हे काम करावे लागू नये, यासाठी मी जे काही करू शकतो ते करेन', असे श्रवण म्हणाला. प्रत्येक मोठे स्वप्न खऱ्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने पूर्ण होते, हे श्रवण कुमारने दाखवून दिलंय. तो आता अनेक लोकांसाठी प्रेरणास्रोत बनलाय. श्रवणचे यश केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.