Meta Job Success Story: चांगलं शिक्षण आणि चांगल्या पगाराची नोकरी हे अनेकांचच स्वप्न असतं. बरीच मंडळी हे स्वप्न सहजगत्या साकार करतात. तर, काहींना या स्वप्नाचा पाठलाग करताना प्रचंड मेहनत करावी लागते. अर्थात मेहनतीचा भाग कोणालाही चुकलेला नाही, पण काहींच्या वाट्याला तुलनेनं आव्हानंच जास्त येतात. त्यावरही मात करत ही मंडळी स्वप्नांचं उत्तुंग शिखर गाठतात आणि त्यांचं यश पाहून सारेच भारावून जातात.
सध्या अशीच एक यशोगाथा सोशल मीडियापासून माध्यमांपर्यंत चर्चेत आहे. ही Success Story आहे उत्तर प्रदेशच्या त्रापित बंसल (Trapit Bansal) नावाच्या एका तरुणाची. हा तोच तरुण आहे ज्याला Meta (Facebook ची पॅरेंट कंपनी) कडून 'सुपर इंटेलिजेंस टीम'साठी कोट्यवधींच्या पगाराची नोकरी मिळाली आहे.
त्रापितला देण्यात येणाऱ्या वार्षिक पगाराचा आकडा इतका मोठा आहे की, त्यातचे शून्य मोजतानाच अनेकांचा गोंधळ उडत आहे. मेटाकडून भारतातील या तरुणाला तब्बल 854 कोटी रुपये इतकं दणदणीत पॅकेज ऑफर केलं आहे. ही रक्कम ऐकताच अनेक मंडळी हैराण होत आहेत.
त्रापित बंसल मुळचा उत्तर प्रदेशचा असून, त्यानं सुरुवातीचं सर्व शिक्षण तिथूनच पूर्ण केलं. यानंतर त्यानं आयआयटी कानपूर येथून 'मॅथमॅटीक्स अँड स्टॅटिस्टीक्स' विषयात बीएससीपर्यंतचं शिक्षण घेतलं. पदवी शिक्षणानंतर त्रापित पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. जिथं त्यानं युनिवर्सिटी ऑफ मॅसाच्युसेट्स एमहर्स्ट (University of Massachusetts Amherst) इथून मास्टर्स आणि PhD चं शिक्षण पूर्ण केलं.
OpenAI, Facebook, Google, Microsoft आणि IISc Bangalore इथं तो कैक वर्षे इंटर्नशिप करत होता. 2012 मध्ये त्यानं आयरिश अमेरिकी कंपनी अॅक्सेंचरमध्ये अॅनालिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय भारतीय विज्ञान संस्थान इथंही तो रिसर्च असिस्टंट म्हणून कार्यरत होता. 2022 मध्ये तो OpenAI साठी काम करु लागला आणि त्यानंतर त्यानं Meta ची सुपर इंटेलिजेंस टीम जॉईन करत कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला असंच म्हणायला हरकत नाही.