Sunjay Kapur Death: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्वाश्रमीचा पती आणि उद्योजक संजय कपूरचे निधन झाले आहे. वयाच्या 53व्या वर्षी त्याचे लंडनमध्ये निधन झाले आहे. पोलो मॅच खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली, अशी माहिती समोर येतेय. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. संजय कपूर यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर करिश्मा कपूर हिलादेखील मोठा धक्का बसला आहे.
अभिनेता आणि लेखल सुहेल सेठ यांनी संजय कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी एक्सवर एक भावपूर्ण पोस्ट करत दुख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'संजय कपूर यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. आज सकाळी इंग्लंडमध्ये त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात मी सहभागी आहे. तसंच, सोनाकॉमस्टारच्या कर्मचाऱ्यांप्रतीदेखील संवेदना... ओम शांती'
एका रिपोर्टनुसार, जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय कपूर गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत होते. तेव्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तेव्हा त्यांनी खेळ थांबवण्याची विनंती केली आणि मैदानातून बाहेर पडले. रिपोर्टनुसार, संजय कपूरकडून चुकीने मधमाशी गिळली गेली आणि गळ्यावर डंख लागल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती समोर येतेय. मात्र अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये.
संजय कपूर व्यवसायिक होते. ते सोना कॉमस्टारचे चेअरमेन होते आणि भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांना पोलो खेळण्याची फार आवड होती. तसंच, ते पोलो टीमचे मालकदेखील होते.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी 2003मध्ये लग्न केले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षातच त्यांच्या नात्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. 2014मध्ये ते वेगळे झाले. या दोघांनाही समायरा आणि कियान अशी दोन मुलं आहेत. रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरने तिची आई बबीता कपूर यांच्या सांगण्यावरुन संजय कपूर यांच्याशी लग्न केले होते. मात्र या लग्नाला वडील रणधीर कपूर यांचा नकार होता. मात्र त्यांचे हे लग्न फारकाळ टिकले नाही. कायदेशीर लढाईनंतर ते वेगळे झाले. त्यानंतर मुलांचा ताबा करिश्माला मिळाला.