Men’s Toilet Location In Supreme Court: सर्वोच्च न्यायालयातील पुरुषांच्या शौचालयावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयातील पुरुषांच्या शौचालयाचं इमारतीमधील स्थानावर आक्षेप नोंदवला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये इंदिरा यांनी, पुरुषांचे शौचालय कॉरिडोरच्या मध्यभागातून कॉरिडोअरच्या एका बाजूला हलवावे. सदर शौचालयाचे सध्याचे स्थान "महिलांसाठी अत्यंत आक्षेपार्ह" आहे, असा दावा इंदिरा यांनी केला आहे. त्यांनी थेट भारताच्या सरन्यायाधीशांना (CJI) या मुद्द्याची दखल घेण्याची विनंती केली आहे.
"अरे देवा! पुरूषांचे शौचालय कॉरिडॉरच्या मध्यभागातून सर्वोच्च न्यायालयाच्या कॉरिडॉरच्या शेवटी कधी हलवले जाईल? महिलांसाठी अत्यंत आक्षेपार्ह जागी आहे हे शौचालय. भारताच्या सरन्यायाधीशांनी याची नोंद घ्यावी," अशी पोस्ट इंदिरा जयसिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन शेअर केली आहे. या मजकुरासहीत इंदिरा यांनी त्या शौचालयाबाहेर डोक्याला हात लावून उभ्या असल्याचे दाखवणारा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत इंदिरा यांच्या मागील बाजूस दिसणाऱ्या दाराच्या वरील भागी असलेल्या फलकावर, "पुरुषांचे शौचालय फक्त वकिलांसाठी," असं लिहिलेलं आहे.
पुढील पोस्टमध्ये, इंदिरा यांनी सर्वोच्च न्यायालयात पुरुषांच्या शौचालयाचे स्थान आक्षेपार्ह का आहे हे स्पष्ट केले आहे. शौचालय कॉरिडॉरच्या मध्यभागी 'मोठ्या सार्वजनिक जागेत' आहे, असं इंदिरा यांनी म्हटलं आहे. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की पुरुषांच्या या शौचालयाचे स्थान अशा काळात निश्चित करण्यात आले आहे जेव्हा फारशा महिला वकील सर्वोच्च न्यायालयामध्ये कार्यरत नव्हत्या. "या शौचालयाचे सध्याचे स्थान असं सूचित करते की ते अशा काळात बांधण्यात आलं आहे जेव्हा मोठ्या संख्येनं महिला वकील नव्हत्या. आता काळ बदलला आहे आणि त्यानुसार वास्तुकला देखील बदलली पाहिजे," असे ज्येष्ठ वकील असलेल्या इंदिरा यांनी म्हटलं आहे.
इंदिरा जयसिंग या वकील असण्याबरोबरच मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. इंदिरा या लिंग समानता आणि सामाजिक न्यायासाठी आपल्या कायदेविषयक ज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मुंबईत जन्मलेल्या इंदिरा या 1986 साली मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केलेल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. इंदिरा यांच्या कायदेशीर कारकिर्दीकडे पाहिल्यास त्यामध्ये अनेक ऐतिहासिक खटले आहेत. 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांचे प्रतिनिधित्व इंदिरा यांनीच केले होते. तसेच मेरी रॉयसारख्या प्रकरणांमध्ये महिलांच्या हक्कांसाठी वकिली करणाऱ्या महिला म्हणूनही इंदिरा यांना ओळखलं जातं. याच खटल्यामुळे सीरियन ख्रिश्चन महिलांना समान वारसा हक्क प्राप्त झाला.