कर्नाटक उच्च न्यायालयाने रेणुकास्वामी हत्याकांडातील प्रमुख आरोपी अभिनेता दर्शनला जामीन मंजूर केला आहे. गतवर्षी जून महिन्यात 33 वर्षीय रेणुकास्वामीचं अपहरण करुन आधी छळ आणि नंतर हत्या करण्यात आली होती. अभिनेता दर्शन या हत्येचा मुख्य सूत्रधार होता. कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा न्यायिक अधिकाराचा विकृत वापर असल्याचं म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्याच्या सुटकेवरून एका आठवड्यात उच्च न्यायालयाला फटकारण्याची ही दुसरी वेळ आहे. जामीन मंजूर करताना विवेकबुद्धीचा वापर करण्यात तुम्ही अयशस्वी झाला आहात असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.
आज दुपारी न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने आम्ही उच्च न्यायालयासारखी चूक करणार नाही असं सांगितलं आहे. "आम्ही दोषी ठरवण्याचा किंवा निर्दोष सोडण्याचा कोणताही निर्णय देणार नाही," असं संतापलेल्या सर्वोच्च न्यायालयाने मुख्य आरोपी अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्या वकिलांना सांगितले.
"उच्च न्यायालयाने निर्दोष सोडण्याचा आदेश जाहीर केला असं तुम्हाला वाटत नाही का?," अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2024 च्या उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशातील भाषेवर नाराजी व्यक्त करताना म्हटलं.
"उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने आदेश दिला हे सांगताना खूप वाईट वाटतं. उच्च न्यायालय इतर प्रकरणांमध्येही अशाच प्रकारचा आदेश देते का?," असा प्रश्न न्यायमूर्ती पारडीवाला यांनी विचारत सांगितलं की, "जामीन देताना जे तर्क दिले आहेत ते जास्त सतावणारे आहेत. विशेषतः खून खटल्यासाठी अटकेची कारणे देण्यात आली नव्हती असं म्हणणं".
"प्रथमदर्शनी हा न्यायालयीन अधिकाराचा विकृत वापर आहे," असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. "एखाद्या कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशाने अशी चूक करणे स्वीकारार्ह आहे... पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने!," असं आश्चर्यही त्यांनी व्यक्त केलं.
नाराज असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने खटला दररोज चालेल असं सांगितल्यानंतर राज्याला प्रश्न विचारले. न्यायमूर्ती पार्डीवाला यांनी इतर आरोपी वर्षानुवर्षे तुरुंगात शिक्षा भोगत असताना, संधीची वाट पाहत असताना या प्रकरणाकडे इतके लक्ष का द्यावे? असा प्रश्न विचारला. सर्वोच्च न्यायालयाला नंतर खटला सहा महिन्यांत पूर्ण होईल असं कळवण्यात आलं.
दर्शन थुगुदीपा आणि इतर 13 जण रेणुकास्वामीच्या हत्येचा आरोप असलेल्या तुरुंगात आहेत. दर्शनची मैत्रीण आणि अभिनेत्री पवित्रा गौडाला अश्लील संदेश पाठवल्याने अभिनेत्याच्या साथीदारांनी त्याच्या आदेशावरुन हत्या केल्याचा आरोप आहे. 9 जून रोजी रेणुकास्वामीचा मृतदेह नाल्यात आढळला होता.
रेणुकास्वामीला बंगळुरूला आणण्याची व्यवस्था करण्यासह, दर्शनने या गुन्ह्याच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत सहभागी असलेल्या चार जणांना 50 लाख रुपये दिले असा पोलिसांचा आरोप आहे.