Diamond Market Video: गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सूरतला डायमंड आणि टेक्सटाइल सिटी असंही म्हणतात. डायमंड सिटी अशी ओळख असल्याने शहरातील महिधपुरा आणि वराछा परिसरामध्ये आपल्याकडे भाजीपाल्याची बाजारपेठ असते तशी चक्क हिऱ्यांच्या दुकानांची बाजारपेठ आहे. येथे लोक चक्क रस्त्यावर, फुटपाथवर आणि खाली बसून हिऱ्यांची खरेदी-विक्री करतात. वराछा परिसरामधील मिनी बाजार डायमंड नावाची बाजारपेठेतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये सर्वसामान्य जनतेबरोबरच हिरे व्यापारीही रस्त्यावर हिरे खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात.
या ठिकाणी नेहमीप्रमाणे हिऱ्यांचा व्यापार करणारे लोक वराछा डायमंड बाजारामध्ये सकाळीच जमा होतात. या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर खरेदीसाठी ग्राहकही जमू लागतात. त्याचवेळी अचानक बाजारामध्ये एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरु झाली की रस्त्यावर हिरे पडले आहेत. लोकांनी रस्त्यावर नीट निरखून पाहिलं तर खरोखरच रस्त्यावर छोट्या आकाराचे हिरे पडले होते. त्यानंतर हे हिरे गोळा करण्यासाठी एकच गोंधळ सुरु झाला.
रस्त्यावर पडलेले हिरे गोळा करण्यासाठी दुकानदार आणि सर्वसामान्य जनता हातातील सर्व कामं सोडून गेले. प्रत्येकजण हिरे वेचण्यासाठी तडफडत होता. लहान मुलांपासून महिला पुरुष सर्वचजण हिरे वेचण्यात अडकले होते. अनेकांनी या सर्व घटनाक्रमाचा व्हिडीओ शूट केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनेकजण रस्त्याच्या बाजूला बसून छोटे छोटे हिरे गोळा करत असल्याचं दिसलं. काहींच्या हाती एकही हिरा लागला नाही तर काहींना अनेक हिरे मिळाले. बराच वेळ हा सारा गोंधळ सुरु होता.
रस्त्यावर सापडलेले हे हिरे खरे आहेत की खोटे याचा तपास करण्यात आला असता नवीच माहिती समोर आली. हे हिरे खरे नसल्याचं तपासामध्ये समजलं. हे खाणीतून आलेले हिरे नसून ते लॅबमध्ये तयार केले जाणारे सीबीडी हिरे असल्याचं स्पष्ट झालं. हे सर्व अमेरिकन डायमंड म्हणून ओखळले जातात. या हिऱ्यांना फारशी किंमत मिळत नाही. अनेक तास हिरे शोधणाऱ्या लोकांना यामागील सत्य कळाल्यानंतर त्यांचा हिरमोड झाला.
#સુરત વરાછા મિનિબજાર રાજહંસ ટાવર પાસે હીરા ઢોળાયાની વાત થતા હીરા શોધવા લોકોની ભીડ થઈ.
— (@KalpeshPraj80) September 24, 2023
પ્રાથમિક સૂત્રો દ્વારા જાણવા મળેલ છે કે આ હીરા CVD અથવા અમેરિકન ડાયમંડ છે..#Diamond #Surat #Gujarat pic.twitter.com/WdQwbBSarl
अमेरिकन डायमंड किलोच्या दराने विकला होता. हा प्रयोगशाळेत तयार केलेला हिरा मैल्यवान नसतो. बाजारपेठेत नक्षीकामासाठी त्याला मागणी असते. मात्र या हिऱ्यांच्या नादात बराच गोंधळ उडाल्याने येथील स्थानिक व्यापारी फारच संतापले आहेत. कोणीतरी आमची मस्करी करण्यासाठी हे मुद्दाम घडवल्याचं सांगत हिरे व्यापारी धीरुभाई नावडिया यांनी संताप व्यक्त केला.