Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामागं अनेकदा काही कारणंही नसतात. यातही लहान मुलांच्या व्हिडीओंची संख्या जास्त असून एखादं मीम जोडून किंवा ट्रेंडमध्ये असणारं एखादं गाणं जोडून हे व्हिडीओ शेअर करण्यात येतात. अशा या सोशल मीडियाच्या वर्तुळात सध्या एक व्हिडीओ बऱ्याचजणांच्या फीडमध्ये येत आहे.
शाळेच्या गणवेशात, शाळेच्या वर्गात ही मुलं एका लयात डान्स करताना दिसत असून, व्हायरल होणारं एक गाणंही बोलताना दिसत आहेत. विश्वास बसणार नाही, पण एखाद्या सेलिब्रिटीच्या व्हिडीओलाही मिळत नाही इतकी लोकप्रियता या व्हिडीओला मिळत आहे.
आतापर्यंत 10 कोटींहून अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून, त्याचे असंख्य मीमसुद्धा तयार करण्यात आले आहेत. 'फ्यूचर जिनिअस' नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मेलूर पंचायत युनियन किंडरगार्डन अँड मिडिल स्कूल, थेरकामूर येथील एका शिक्षकांनी तो व्हिडीओ शेअर केला असून, त्यात Anan Ta Pad Chaye हे गाणं सादर करताना दिसत आहेत. फक्त गाणंच म्हणत नाहीयेत तर चेहऱ्यावर हास्य आणत हे चिमुकले त्यावर ठेकाही धरताना दिसत आहेत.
गाण्याचे बोल स्पष्ट ऐकू येत नसले तरीही कॅमेरासमोर उभं राहण्याचा उत्साह, आपण काहीतरी कमाल करत आहोत याचा आनंद आणि आपले शिक्षत आपल्याकडून मजेशीर गोष्टी करून घेत आहेत याची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत आहे. हे तेच विद्यार्थी आहेत ज्यांचे इतरही व्हिडीओ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात येतात. जिथं विद्यार्थीदशेत या चिमुकल्यांचा आत्मविश्वास वाढवणारे उपक्रम शिक्षक आणि ही शाळा सातत्यानं राबवत तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करताना दिसते.