TAMIL NADU WAKF BOARD Waqf Property Land : तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील कट्टुकोलाई गावात जवळपास 150 कुटुंबांना वक्फ बोर्डाने नोटीस बजावली आहे. वक्फ मालमत्तेवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप या गावातील लोकांवर करण्यात आला आहे. नोटीस पाहून ग्रामस्थ संतापले आहेत. नोटीस घेऊन 150 कुटुंबे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली.
सय्यद अली सुलतान शाह यांनी ही नोटीस जारी केल्याचे कट्टुकोलाई गावाच्या लोकांनी सांगितले. कट्टुकोलाई गावातील जमीन स्थानिक दर्ग्याची असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. दर्गा म्हणजे मुस्लिम संताची कबर असल्याचा दावा करण्यात आला आहे. नोटीसमध्ये ग्रामस्थांना तात्काळ जमीन रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जमीन रिकामी करा नाही तर दर्ग्याला कर भरा असा आदेश या नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या गावातील बहुताश लोक शेतीवर अवलंबून आहेत. नोटीस पाठवलेल्या जमिनीचे जुने कागदपत्रे असल्याचे वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे. तर, ग्रामस्थांनी देखील त्यांच्याकडे सरकारने जारी केलेले जमिनीचे कागदपत्रे आहेत.
हिंदू मुन्नानी नेते महेश ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. वक्फ बोर्डाने पाठवलेल्या नोटीसवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. चार पिढ्यांपासून आम्ही या परिसरात राहतअसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सर्वे क्रमांक 3301 अंतर्गत येणारी जमीन वक्फ जमीन म्हणून घोषित करण्यात आली आहे.
यापूर्वीही अशीच एक घटना घडली होती. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील तिरुचेंदुरई गावातही असेच काहीसे घडले. तिथे तामिळनाडू वक्फ बोर्डाने सुमारे 480 एकर जमिनीवर दावा केला होता. यामध्ये चोल राजवंशातील 1500 वर्षे जुने मंदिर समाविष्ट होते. गावकऱ्यांना सांगण्यात आले की वक्फ बोर्डाकडून एनओसी घेतल्याशिवाय ते त्यांची जमीन विकू शकत नाहीत.