BJP Ignored Eknath Shinde Ajit Pawar Group: राज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये तेलुगू देसमचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपालपदी सोमवारी नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अवहेलना सुरूच आहे. तीन राज्यांच्या राज्यपालांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. त्यात गोव्याच्या राज्यपालपदी माजी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांचा समावेश आहे. राजू हे तेलुगू देसमचे नेते असून, मागील सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषविले होते.
लोकसभेत 16 खासदार असलेल्या तेलुगू देसमला भाजपकडून नेहमीच झुकते माप मिळते. केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली होती. राज्यपालांच्या नियुक्तीत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची शिफारस मान्य करण्यात आली. तसेच 12 खासदार असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जतना दलाच्या मागण्या मान्य करण्यात येतात. यंदाच्या अर्थसंकल्पात बिहारवर विशेष भर देण्यात आला. तेलुगू देसम वा संयुक्त जनता दलाच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावरील सात खासदार असलेल्या शिवसेना शिंदे गटाला भाजपकडून फारसे महत्त्व दिले जात नाही हे अनुभवास येते.
केंद्रात तेलुगू देसमला हवाई वाहतूक तर संयुक्त जनता दलाकडे ग्रामविकास व पंचायत राज ही महत्त्वाची खाती मिळाली आहेत. शिंदे गटाचे प्रताप जाधव यांच्याकडे आयुष स्वतंत्र कार्यभार हे तुलनेत कमी महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले आहे. शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी राज्यपालपदी नियुक्तीचे आपल्याला दिलेले आश्वासन पाळण्यात आले नसल्याचे मागे विधान केले होते. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करू नये म्हणून अडसूळ यांना भाजपच्या धुरिणांनी राज्यपालपदाचे आश्वासन दिले असेल तर ते अद्यापही पाळण्यात आलेले नाही.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला अजूनही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची प्रतीक्षा आहे. मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण राज्यमंत्रीपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली होती. तेव्हा राष्ट्रवादीने पद नाकारले होते. त्यानंतर भाजपकडून मंत्रिपदाबाबत काहीच सूचित करण्यात आलेले नाही. तेलुगू देसम वा नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला विशेष महत्त्व मोदी सरकारकडून मिळते. त्या तुलनेत राज्यातील एकनाथ शिंदे वा अजित पवारांना भाजपकडून महत्त्व दिले जात नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.