Jyoti Suicide Case: ग्रेटर नोएडामधील शारदा विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात बीडीएस दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 21 वर्षीय ज्योती शर्माने शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना काही वेळातच सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. या प्रकरणावरून विद्यापीठ प्रशासनावर विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. नॉलेज पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी विद्यापीठाच्या डीनसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन प्राध्यापकांना अटक केली असून, विद्यापीठाने त्यांना निलंबित केले आहे. तसेच, घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
ज्योतीच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस आणि कुटुंबीयांना न सांगता तिच्या मृतदेहाला फासावरून खाली उतरवले आणि तिला अक्षरशः ओढत रुग्णालयात नेले. गुरुग्रामचे रहिवासी रमेश जांगडा यांनी शारदा विद्यापीठाचे डीन डॉ. एम. सिद्धार्थ, प्राध्यापिका सैरी मॅडम, महेंद्र, अनुराग अवस्थी, सुरभी, आशीष चौधरी यांच्यासह एका अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्वांनी ज्योतीला मानसिक त्रास दिला, धमकावले आणि सतत अपमान केल्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले.
हे ही वाचा: 'असं जगू शकत नाही...' शारदा विद्यापीठातील 21 वर्षीय विद्यार्थिनीची शिक्षकांना कंटाळून आत्महत्या
एफआयआरमध्ये रमेश जांगडा यांनी सांगितले की, "18 जुलै 2025 रोजी माझ्या मुलीने होस्टेलच्या 1209 क्रमांकाच्या खोलीत गळफास घेतला. विद्यापीठ प्रशासनाने पोलीस व कुटुंबीयांना कळवले नाही आणि तिला फासावरून खाली उतरवून ओढत रुग्णालयात नेले." रमेश जांगडा यांच्या मते, आरोपी प्राध्यापकांनी केवळ त्रास दिला नाही, तर आत्महत्येशी संबंधित पुरावेही लपवले.
हे ही वाचा: Mumbai Local Train Blast Case: मुंबईतील लोकल साखळी बॉम्बस्फोट 2006 प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
त्यांनी याचा तपशील देताना सांगितले की, 16 जुलै रोजी सुरभी मॅडमने वर्गातच ज्योतीला धमकावले आणि म्हटले "तुम्ही खूप तक्रारी करता, याची शिक्षा मिळेल." 17 जुलै रोजी महेंद्र, सैरी मॅडम आणि आशीष चौधरी यांनी पुन्हा एकदा तिला धमकावले की, तुझे असाइनमेंट अप्रूव्ह करणार नाहीत आणि परीक्षा देऊ देणार नाहीत. याबाबत तिने लिहून ठेवलेली चिठ्ठीही सापडली आहे.
ज्योतीच्या वडिलांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री त्यांनी मुलीला फोन केला पण तिने फोन उचलला नाही. त्यानंतर खोलीतल्या दुसऱ्या विद्यार्थिनीनेही दरवाजा वाजवला पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही पोलिसांना माहिती दिली होती पण विद्यापीठ प्रशासनाने पोलीस किंवा कुटुंबीयांना काहीच सांगितले नाही. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ज्योतीने विद्यापीठातील संबंधित प्राध्यापकांवर आणि प्रशासनावर गंभीर आरोप करत स्वतःच्या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरले आहे.
(टीप: आत्महत्येचे विचार त्रासदायक ठरू शकतात. पण आत्महत्या टाळता येऊ शकते. तुम्हाला मदतीची गरज असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता – वंद्रेवाला फाउंडेशन (मुंबई): +91 9999666555 (24x7) आसरा (मुंबई) 022-27546669)