Crime News In Marathi: खेडा जिल्ह्यातील नडियाद येथे झालेल्या तीन रहस्यमयी हत्यांचा उलगडा करण्यास गुजरात पोलिसांना यश आलं आहे. 9 फेब्रुवारी रोजी तीन जणांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला विषारी दारूमुळं हे मृत्यू झाले असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिस तपासात एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. एका शिक्षकाने डेथ टेस्ट करण्याच्या नादात आपल्याच शेजाऱ्यांच्या कोल्डड्रिंकमध्ये विषारी पदार्थ टाकून दिला होता. त्यातच तिघांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक हरिकिशन मकवाना याने त्याची 25 लाख रुपयांची विम्याची रक्कम कुटुंबाला मिळावी यासाठी आत्महत्येचा प्लान केला होता. मात्र विम्याचे पैसे तेव्हाच मिळाले असते जर मृत्यू नैसर्गिक झाला असता. पण आपला मृत्यू हा नैसर्गिक वाटावा यासाठी त्याने काही योजना आखल्या होत्या. प्लान पुढे नेण्याआधी त्याने तो इतरांवर आजमवायचा विचार केला. त्याने सुरुवातीला सोडियम नायट्राइट नावाचे विष दुसऱ्यांना देण्याचे ठरवले.
मकवाना त्याच्या वडिलांच्या मृत्यूने दुखी होता आणि आर्थिकदृष्ट्याही तो परिस्थितीशी झगडत होता. कायदेशीर तणावामुळं त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला असं त्याला वाटत होतं. त्यामुळं त्याने त्याचा मृत्यूदेखील एक घटना म्हणून दाखवण्यासाठी ही योजना बनवली.
मकवाना याने ऑनलाइन सोडियम नायट्रेड मागवलं होतं. त्यानंतर त्यात कोल्ड ड्रिंक मिसळले. त्याने सगळ्यात आधी ते कोल्डड्रिंक त्याचा मूक-बधिर शेजारी कनुभाई याला दिले. जेणेकरुन तो बचावला तरी तो हे कोणालाही सांगणार नाही. कनुभाई यांनी हे ड्रिंक दोन आणखी जणांना दिले. योगेश गंगाराम कुशवाह आणि रविंद्र भाई राठोड यांनाही दिले. मात्र कोल्डड्रिंकमध्ये विष असल्याने तिघांचा मृत्यू झाला.
सुरुवातीला पोलिसांना वाटले की हा विषारी दारूमुळं मृत्यू झाले आहेत. मात्र जेव्हा दारूत कोणत्याही प्रकारचे विष आढळले नाही तेव्हा पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली. तेव्हा मृत्यूचे खरे कारण सोडियम नायट्राइट होते, असं समोर आले. आरोपीला तांत्रिकामुळं ही आयडिया मिळाली होती, असं समोर आले आहे. जवळपास 28 दिवसांच्या तपासानंतर पोलिस हे प्रकरण सोडवण्यास यशस्वी ठरले आहेत. पोलिसांनी मकवाना यांना अटक केली आहे.