होळीच्या पार्श्वभमूमीवर रंग लावण्यापासून तीन जणांना रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एका 25 वर्षीय तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं वृत्त पीटीआयने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलं आहे. हंसराज असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. हंसराजने कलर लावण्यापासून रोखलं असता त्याला तिघांना लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंसराज स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत होता.
बुधवारी, रालवास गावातील रहिवासी अशोक, बबलू आणि कालूराम हे मृत हंसराजला रंग लावण्यासाठी स्थानिक ग्रंथालयात पोहोचले होते. हंसराज स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने तिथे अभ्यास करत होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) दिनेश अग्रवाल यांनी पीटीआयला सांगितलं की, हंसराजने रंग लावण्यास नकार दिल्यानंतर तिघांनी त्याला लाथा घातल्या आणि बेल्टने मारहाण केली.
#Rajasthan: A 25-year-old man, Hansraj Meena, was strangled to death in Dausa district, after he refused to let three men apply #Holi colours on him. The accused men, Ashok, Bablu, and Kaluram, allegedly kicked and beat him before killing him. 1/2#Holi2025 #HappyHoli pic.twitter.com/BIHWUKd7I2
— Siraj Noorani (@sirajnoorani) March 13, 2025
एका आरोपीने हंसराजचा गळा दाबून हत्या केली, असं एएसपी अग्रवाल यांनी सांगितलं. मृताच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी हंसराजचा मृतदेह घेऊन निषेध केला आणि गुरुवारी पहाटे 1 वाजेपर्यंत परिसरातील राष्ट्रीय महामार्ग रोखला. हंसराजच्या कुटुंबाला 50 लाख रुपये भरपाई, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि आरोपी तिघांना तात्काळ अटक करण्याची मागणी निदर्शकांनी केली. पोलिसांच्या आश्वासनानंतर अखेर मृतदेह महामार्गावरून हटवण्यात आला, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दुसऱ्या घटनेत, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका गृहनिर्माण संकुलात होळी साजरी करताना झालेल्या वादातून एका व्यक्तीने 17 वर्षीय मुलावर हल्ला करून जखमी केल्याचं पोलिसांनी शुक्रवारी सांगितलं. पीटीआयच्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री डोंबिवली शहरात घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, गृहनिर्माण संकुलातील मुलांचा एक गट एकमेकांवर पाण्याचे फुगे फेकत असताना चुकून एक फुगा जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर पडला. आरोपीने गटातील एका मुलाला मारहाण केली आणि त्याच्यावर धारदार वस्तूने हल्ला केला, ज्यामुळे तो जखमी झाला, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.