Richest Indians List Akash Anant Ambani's Total Net worth : भारतातील लोकप्रिय बिझनेसमेन मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. मुकेश अंबानी यांना दोन मुलं असून आकाश आणि अनंत अशी त्यांची नावं आहेत. 360 वन वेल्थ (ONE Wealth) आणि क्रिसिल (Crisil) या संस्थांनी मिळून एक अहवाल तयार केला आहे. त्या अहवालात त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत, याविषयी माहिती दिली आहे.
या अहवालानुसार, आकाश आणि अनंत अंबानी यांची मिळून अशी एकूण संपत्ती 3.59 लाख कोटी इतकी आहे. या यादीत 2013 भारतीयांच्या नावाचा समावेश आहे, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीनं संपत्ती कमावली आहे. या सर्वांची मिळून एकूण संपत्ती सुमारे 100 लाख कोटी रुपये आहे. जी भारताच्या GDP च्या जवळपास एक तृतीयांश आहे. या यादीत अशा लोकांचा समावेश आहे ज्यांच्याकडे किमान 500 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. हे लोक व्यवसायिक, प्रोफेशनल्स, गुंतवणूकदार आणि वारसदार अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतले आहेत. यातील सरासरी संपत्ती 1420 कोटी रुपये आहे.
मुंबई हे भारताचं सर्वात मोठं आर्थिक केंद्र ठरलं आहे. इथे 577 श्रीमंत व्यक्ती आहेत, ज्यांनी स्वतःची संपत्ती निर्माण केली आहे. एकट्या मुंबईची संपत्ती ही संपूर्ण यादीतील 40% आहे. दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर त्याचा वाटा हा 17% आहे, तर बेंगळुरू तिसऱ्या स्थानी असून त्याचा वाटा हा 8% आहे. त्या मागोमाग अहमदाबाद असून त्याचा वाटा 5% आहे.
भारतामध्ये 40 वर्षांखालील 143 तरुण उद्योजक आहेत, जे स्वतःच्या मेहनतीनं श्रीमंत झाले आहेत. यातील बरेच जण डिजिटल स्टार्टअप चालवत आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर, भारतपेचे शश्वत नकरानी हा फक्त 27 वर्षांचा असून सर्वात श्रीमंत तरुणांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
161 लोकांकडे 10,000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. 169 लोकांकडे 5,000 ते 10,000 कोटींपर्यंत संपत्ती आहे. रिलायन्स, टाटा आणि अदानी ग्रुपच्या कुटुंबांजवळ आणि प्रमोटर्सकडे एकत्र मिळून 24% संपत्ती आहे, जी सुमारे 36 लाख कोटी रुपये होते. बँकिंग, टेलिकॉम आणि एव्हिएशन हे क्षेत्र सर्वात जास्त वैयक्तिक संपत्ती निर्माण करणारे ठरले आहेत. या क्षेत्रातील वैयक्तिक श्रीमंती 7900 कोटी ते 8500 कोटी दरम्यान आहे. फार्मा (औषधनिर्मिती) क्षेत्रात सर्वात जास्त श्रीमंत लोक आहेत, त्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेस आणि IT क्षेत्र येतात.
भारताच्या एकूण संपत्तीपैकी 24% हिस्सा महिलांचा आहे. फार्मा क्षेत्रात 33% महिलांचा वाटा आहे, तर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 24% आहे. ईशा अंबानी ही यादीतील सर्वात श्रीमंत महिला आहे. यादीत अशा 72 महिला आहेत ज्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत किंवा मूल्य निर्माण केलं आहे. यापैकी 21 महिला पहिल्या पिढीतील उद्योजिका आहेत. या महिला प्रामुख्याने IT, फाइनान्स आणि ई-कॉमर्स क्षेत्रात काम करतात.