हिमाचल प्रदेशात दोन भावांनी एकाच महिलेशी लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत असून, टीकेचाही सामना करावा लागत आहे. लग्नाच्या कित्येक आठवड्यानंतर दोन्ही भावांनी या टीकेला उत्तर दिलं असून, लग्नामागील कारण सांगितलं आहे. हिमाचलच्या हट्टी जमातीतील प्रदीप आणि कपिल नेगी या दोन भावांनी 'जोडीदार प्रथा' पिढ्यानपिढ्या चालत आली असून, ही परंपरा त्यांच्यावर लादण्यात आली नव्हती असं स्पष्ट केलं आहे.
प्रदीप नेगीने फेसबुकला व्हिडीओ पोस्ट करत त्यात सांगितलं आहे की, "ही जोडीदार प्रथा मागील अनेक पिढ्यापांसून सुरु आहे. या परंपरेत लग्न करणारे आम्ही पहिलेच नाही. भुतकाळापासून ही परंपरा चालत आली असून, यापुढे चालत राहणार आहे". त्याचा भाऊ कपिल नेगीने आम्ही हे लग्न आमच्या मर्जीने केलं असून, आमचा एकत्रित निर्णय होता असं स्पष्ट केलं आहे.
"इतर राज्यांमध्ये अनेक प्रथा आहेत, ज्या लोकांवर लादल्या जातात. पण आमच्यात अशी कोणतीही प्रथा नाही. आमच्यावर प्रथेचं पालन करण्याची जबरदस्ती नाही. आम्हही आमच्या मनाने हे लग्न केलं आहे. हा आमचा एकत्रित निर्णय होता," असं कपिलने सांगितलं आहे.
हिमाचलच्या सिरमौर जिल्ह्यातील शिल्लई गावातील दोन्ही भावांनी एकाच महिलेशी एका दुर्मिळ बहुपती विवाह सोहळ्यात लग्न केले, ज्याला स्थानिक पातळीवर 'जोडीदारा' म्हणून ओळखले जाते. 12 जुलै रोजी सुरू झालेल्या या दुर्मिळ विवाहाने शेकडो ग्रामस्थांचंच लक्ष वेधून घेतलं नाही, तर सोशल मीडियावरही व्यापक चर्चेचा विषय बनला.
हिमाचलमध्ये अनेक पती असणं दुर्मिळ असले तरी, राज्याच्या महसूल कायद्यांतर्गत जोडीदारा प्रथा अजूनही मान्य आहे. दरम्यान, भावांनी सांगितले की ही प्रथा केवळ हिमाचलपुरती मर्यादित नाही तर उत्तराखंडच्या जौनसर-बावर भागातही पाळली जात आहे.
या दुर्मिळ परंपरेबद्दल बोलताना प्रदीप नेगी म्हणाला की, भाऊ आणि वधू लग्नाला सहमत झाले आणि ते त्यांच्यावर लादले गेले नव्हते. "या लग्नात, आम्ही तिघांनीही (लग्नाला) सहमती दर्शवली. दोन्ही कुटुंबे लग्नासाठी तयार होती," असं त्याने सांगितलं. दरम्यान तिघांना फोटो आणि व्हिडीओंवर फार अपमानास्पद प्रतिक्रिया मिळत असून, आम्ही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत असं सांगितलं आहे.
"सोशल मीडियावर अनेकजण आमच्या फोटो आणि व्हिडीओवर आक्षेपार्ह कमेंट्स करत आहेत. मला त्यांना सांगायचं आहे की, तुम्ही आमचा छळ करताय असं समजू नका. आम्ही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत. आम्ही आमची परंपरा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देत आहोत," असं प्रदीपने म्हटलं आहे.
प्रदीपने आम्गी एका गरीब कुटुंबातून आहोत असंही सांगितलं. त्याच्या भावाने पुढे म्हटलं की, त्यांनी प्रसिद्ध होण्यासाठी लग्न केलं नाही. "आमचा (फेसबुक) पेज बनवण्याचा कोणताही हेतू नव्हता. प्रसिद्ध होण्याच्या उद्देशाने आम्ही लग्न केलं नव्हतं. ही बातमी संपूर्ण भारतात पसरली. आम्ही सामान्य पद्धतीने लग्न केले," असं कपिल म्हणाला.
त्याला जोड देत घालत प्रदीप म्हणाला, "या लग्नाचा एकमेव उद्देश एकत्र राहणे आणि एकमेकांवर प्रेम करणे हा होता. भावांमधील प्रेम असेच राहावे अशी आमची प्रार्थना आहे".
FAQ
1) हिमाचल प्रदेशातील 'जोडीदार प्रथा' म्हणजे काय?
'जोडीदार प्रथा' ही हिमाचल प्रदेशातील हट्टी जमातीतील एक प्राचीन परंपरा आहे, ज्यामध्ये दोन किंवा अधिक भाऊ एकाच स्त्रीशी विवाह करतात. ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे आणि ती हिमाचलच्या काही भागांमध्ये आणि उत्तराखंडच्या जौनसार-बावर क्षेत्रात प्रचलित आहे.
2) या विवाहाला कायदेशीर मान्यता आहे का?
होय, 'जोडीदार प्रथा' ही हिमाचल प्रदेशाच्या महसूल कायद्यांनुसार मान्यताप्राप्त आहे, जरी बहुपती (पॉलीआंड्री) ही संकल्पना भारतात दुर्मिळ आहे.
3) या विवाहामागील उद्देश काय होता?
प्रदीप आणि कपिल यांनी स्पष्ट केले की, हा विवाह प्रसिद्धी मिळवण्यासाठी नव्हता, तर एकत्र राहणे आणि परस्पर प्रेम टिकवून ठेवणे हा त्यामागील उद्देश होता. त्यांनी सामान्य पद्धतीने विवाह केला आणि त्यांच्या कुटुंबांनीही याला संमती दिली.
4) ही प्रथा केवळ हिमाचल प्रदेशापुरती मर्यादित आहे का?
नाही, ही प्रथा हिमाचल प्रदेशाबरोबरच उत्तराखंडच्या जौनसार-बावर क्षेत्रातही प्रचलित आहे.
5) या प्रथेची पार्श्वभूमी काय आहे?
ही प्रथा हट्टी जमातीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक रचनेतून उद्भवली आहे. यामागील एक कारण म्हणजे कुटुंब एकत्र ठेवणे आणि मालमत्तेचे विभाजन टाळणे. ही प्रथा स्वेच्छेने पाळली जाते आणि यात कोणताही दबाव नसतो, असे नेगी बंधूंनी सांगितले.