Marathi News> भारत
Advertisement

'भारतातील ‘पालिटिकल सिस्टम’ घसरणीला लागली म्हणून...', राऊतांचा हल्लाबोल; 'मोदींच्या काळात...'

Indian Political System Destroyed: "अमेरिकेची व भारताची स्थिती सारखीच. तिकडे ट्रम्प हे मोदींसारखे वागतात व इथे मोदी ट्रम्प यांच्यासारखे वागतात," असा टोला राऊतांनी लगावला आहे.

'भारतातील ‘पालिटिकल सिस्टम’ घसरणीला लागली म्हणून...', राऊतांचा हल्लाबोल; 'मोदींच्या काळात...'

Indian Political System Destroyed: "जगभरातील राजकीय वातावरण निराशाजनक आहे. तरीही अधूनमधून सुखावणाऱ्या बातम्या येत असतात. पाच तारखेला सकाळी 11 वाजता राज्यसभा सुरू झाली तेव्हा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि उपसभापती हरवंश सिंग यांच्यात खडाजंगी झाली. संसदेची बाह्य सुरक्षा मोदी काळात लष्करसदृश सुरक्षा दलांना दिली. लोकशाहीच्या मंदिरात सैन्य असे हे वातावरण, पण आता संसदेच्या ‘लॉबी’ परिसरात आणि प्रत्यक्ष सभागृहातील जागेतदेखील ‘सीआयएसएफ’चे जवान घुसवले. हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी हानिकारक आहे," असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "विरोधक लोकशाही मार्गाने सभागृहात निषेध करतात. प्रसंगी सभापतींसमोर येतात. क्वचितप्रसंगी सभागृहाच्या आसनासमोर ‘वेल’मध्ये येतात. या विरोधकांना रोखण्यासाठी संसदेचे स्वतःचे ‘मार्शल’ होते. संसदेची स्वतःची सुरक्षा व्यवस्था होती. एखाद्या सदस्याने जास्तच गडबड केली तर हे संसदेचे ‘मार्शल’ या सदस्यांना सरळ उचलून बाहेर नेत. आता या मार्शलची जागा ‘सीआयएसएफ’ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सशस्त्र जवानांनी घेतली. यावर विरोधी पक्षनेते खरगे यांनी विचारले, “ही सिस्टम का बदलली? आम्ही खासदार म्हणजे दहशतवादी आहोत काय?” खरगे यांचे हे विधान योग्य आहे," असं म्हणत राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.

भारतातील ‘पालिटिकल सिस्टम’देखील पूर्णपणे घसरणीला

"मोदी व त्यांच्या सरकारला स्वतःच्या सावलीची भीती वाटते व त्यासाठी त्यांनी सर्व सिस्टम बदलली. राजकारणाचा उबग यावा व सर्व सोडून हिमालयात जावे असे वातावरण देशात आहे. या पार्श्वभूमीवर एक आशादायी बातमी अमेरिकेतून आली. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हारिस यांनी याच दिवशी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. (6 ऑगस्ट) हा योगायोगच आहे. कमला म्हणाल्या, “मला सध्याच्या राजकारणाचा उबग आलाय. यापुढे कोणत्याही राष्ट्रीय पदासाठी निवडणूक लढणार नाही.” त्यात कॅलिफोर्नियाच्या ‘गव्हर्नर’ पदाचाही समावेश आहे. श्रीमती हारिस पुढे जे सांगतात ते महत्त्वाचे. “अमेरिकेतील पालिटिकल सिस्टम उद्ध्वस्त झाली आहे आणि मी स्वतः लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढण्याइतकी मजबूत राहिलेली नाही याची खंत आहे.” कमला हारिस यांना जे वाटते तसे आपल्या देशातील किती राजकारण्यांना वाटते? भारतातील ‘पालिटिकल सिस्टम’देखील आज पूर्णपणे घसरणीला लागली आहे व मोदी यांच्या काळात ती सुधारण्याची शक्यता नाही, म्हणून कोणी राजीनामा देणार नाही,"  असं राऊत यांनी, 'सामना'च्या 'रोखठोक'च्या लेखातून राऊतांनी म्हटलं आहे.

भारतात ‘उबग’ यावा अशा घटना रोज घडतात

"कमला हारिस यांना अमेरिकेतील सध्याच्या राजकारणाचा उबग आला व त्यांनी तसे स्पष्ट बोलून दाखवले. भारतात ‘उबग’ यावा अशा घटना रोज घडत आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या प्रवक्त्या आरती साठे यांची थेट मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली गेली. भाजपने 2 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या प्रवक्त्यांची एक यादी जाहीर केली. त्यात 21 व्या क्रमांकावर आरती साठे यांचे नाव आहे व आता त्या मुंबई हायकोर्टाच्या ‘मायलार्ड’ बनल्या. कुणालाच याचा उबग आला नाही. हे नक्की काय सुरू आहे?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

ट्रम्प हे मोदींसारखे वागतात व इथे मोदी ट्रम्प यांच्यासारखे वागतात

"उद्या मोदींचा भाजप सत्तेवरून गेला तरी देशाच्या न्यायव्यवस्थेवर त्यांचा ताबा राहील. मुंबई हायकोर्टातले किमान सहा न्यायमूर्ती आरती साठेंप्रमाणे थेट भाजपशी संबंधित आहेत व आपला न्यायवृंद अशा नेमणुकांना परवानगी देतो. कारण सगळ्यांचेच हात दगडाखाली अडकले. येथे धर्मराज कोणी उरले नाही. त्यामुळे सत्याच्या दिशेने जाणारा रथ चिखलात अडकून पडतो. अमेरिकेची व भारताची स्थिती सारखीच. तिकडे ट्रम्प हे मोदींसारखे वागतात व इथे मोदी ट्रम्प यांच्यासारखे वागतात. सगळीच व्यवस्था बिघडली. कमला हारिस काय करणार? त्या चूपचाप निघून गेल्या," असं राऊत यांनी लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

FAQ

1) संजय राऊत यांनी भारतीय राजकीय व्यवस्थेबाबत काय म्हटले आहे?

राऊत यांनी म्हटले आहे की, भारतातील राजकीय व्यवस्था पूर्णपणे घसरणीला लागली आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारला स्वतःच्या सावलीची भीती वाटते, त्यामुळे त्यांनी सर्व व्यवस्था बदलल्या आहेत. यामुळे राजकारणाचा उबग येऊन सर्व सोडून हिमालयात जावे असे वातावरण देशात निर्माण झाले आहे.

2) कमला हारिस यांचा उल्लेख राऊत यांनी का केला?

संजय राऊत यांनी अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हारिस यांच्या राजकारणातून निवृत्तीच्या घोषणेचा उल्लेख केला. कमला हारिस यांनी म्हटले की, त्यांना सध्याच्या राजकारणाचा उबग आला आहे आणि अमेरिकेतील राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. राऊत यांनी याचा उल्लेख करून भारतातील राजकीय व्यवस्थेची घसरण याच्याशी तुलना केली आहे.

3) आरती साठे यांच्या नियुक्तीबाबत राऊत यांनी काय म्हटले आहे?

राऊत यांनी भाजपच्या प्रवक्त्या आरती साठे यांच्या मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की, भाजपच्या प्रवक्त्यांची थेट न्यायाधीशपदी नियुक्ती ही धक्कादायक आहे आणि यावर कुणालाच उबग आला नाही, हे आश्चर्यकारक आहे.

Read More