Sanjay Raut Slams PM Modi: "भारतीय लोकशाहीची धूळधाण उडवणारे दशक म्हणून 2014 नंतरच्या कालखंडाकडे पाहायला हवे. 2014 नंतर मते विकत घेणे, जादूटोणा, मंत्रतंत्र, पक्ष विकत घेणे या प्रकारांना भारतीय राजकारणात महत्त्व प्राप्त झाले. ‘सदसद्विवेक बुद्धी’ हा शब्दच लोकशाहीतून नष्ट झाला. एक मनोरंजक छायाचित्र या आठवड्यात प्रसिद्ध झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले आहेत व त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, मुश्रीफ, सरनाईक, भुजबळ असे ‘चेहरे’ होते. गंमत म्हणजे या सगळ्यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली श्री. फडणवीस व त्यांचा पक्ष चक्की पिसायला तुरुंगात पाठवणार होता. मात्र प्रत्यक्षात त्यांनी यापैकी अनेकांवर कारवाई करून दहशत निर्माण केली आणि आज हे सर्व लोक फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आनंदाने जगत आहेत. त्यातल्या अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाणांच्या घरी स्वतः अमित शहा यांनी पायधूळ झाडली व आमरस-पुरीचा पाहुणचार घेतला. भाजप हा शब्दाला, वचनाला, नैतिकतेला जागणारा पक्ष नाही. वारा येईल तशी पाठ फिरवणारे हे सर्व लोक आहेत," असा टोला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
"भाजपचे एक खासदार निशिकांत दुबे हे सतत मुसलमानांना शिव्या घालत असतात. हिंदू-मुसलमानांत तणाव होईल अशी त्यांची विधाने संसदेत व बाहेर असतात. हे दुबे महाशय आता सर्वपक्षीय शिष्टमंडळातून सौदी अरब, कुवेतसारख्या इस्लामी राष्ट्रांत गेले व तेथे जाऊन मुसलमान, इस्लामचे गुणगान केले. “भारतात हिंदू-मुसलमानांत भेद नाही. अल्पसंख्याक वगैरे विषय नाही. आम्ही सर्व एक आहोत. मुसलमानांच्या पाठीशी आम्ही आहोत,” असा मैसूरपाक दुबे यांच्या तोंडून इस्लामी राष्ट्रांत बाहेर पडला. ही सोय, संधीसाधूपणा व डरपोकपणाच आहे. भारतात गरळ ओकायची व इस्लामी राष्ट्रांत जाऊन ‘भारत निधर्मी’ आहे असे सांगायचे हे भाजपच्या सर्व दुब्यांचे चरित्र आहे," असं राऊतांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरातील लेखामध्ये म्हटलं आहे.
"पंतप्रधान मोदी यांचे सर्व राजकारण ‘नकली’ आहे. त्यामुळे त्यांच्या भोवती ‘नकली’ लोकांचा भरणा आहे. पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू केले तेव्हा त्या युद्धाच्या कारवाईची माहिती देण्यासाठी मोदी सरकारने सोफिया कुरेशी यांची निवड केली. आम्ही सेक्युलर आहोत हे जगाला दाखविण्याची त्यांची ही धडपड होती. प्रेसिडंट ट्रम्प यांच्या आदेशाने युद्धबंदी करून मोदी यांनी देशाचे नाक कापले, पण तरीही विजयाचे उत्सव साजरे केले. मोदी ‘युद्ध’ उत्सव साजरा करण्यासाठी गुजरातला गेले. त्या उत्सवात सामील होण्यासाठी सोफिया कुरेशी व त्यांच्या नातेवाईकांना खास आमंत्रित केले आणि त्या कुरेशी कुटुंबाकडून मोदींवर फुले उधळून घेतली. मुसलमान चोर, देशद्रोही, मंगळसूत्र चोर आहेत ही मोदी यांची निवडणूक प्रचारातली भूमिका होती, पण भारतीय सैन्यातील पा. कुरेशी भाजपला मतांच्या राजकारणासाठी व जगासमोर निधर्मी प्रतिमा निर्माण करण्यासाठी हव्या आहेत. या ढोंगावर कोणी बोलायचे नाही. जे बोलतील त्यांना देशद्रोही ठरवले जाईल," असा टोला राऊतांनी लगावला आहे.
"भाजपच्या राजवटीत संस्कार, संस्कृती व नैतिक मूल्यांचे कसे अधःपतन झाले याच्या बातम्या रोज प्रसिद्ध होत आहेत. गंगा-यमुनेत जितके प्रदूषण व कचरा आहे, त्यापेक्षा जास्त प्रदूषण भाजप व त्यांचे टाळ कुटणाऱ्यांच्या विचारांत आहे. वैयक्तिक पातळीवर जे हिंदू आहेत, त्यांना धर्मकार्ये, शंखनाद, व्रतवैकल्ये, घंटानाद अशा कामांत भाजपने गुंतवून ठेवले व त्यासाठी अनेक उपसंस्था निर्माण केल्या. जे भाजप परिवारात ‘नवहिंदू’ म्हणून सामील झाले, ते त्यांच्याही पुढे जाऊन अघोरी कार्य म्हणजेच हिंदुत्व असे मानून पुढे निघाले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी हिंदुत्वाच्या राजकीय विचारांचा स्पर्शही त्यांना झालेला दिसत नाही. भारतात जणू धार्मिक खिचडीच झाली आहे. ही खिचडी आज सगळ्यांनाच प्रिय आहे. धर्माचे विकृतीकरण होत असलेल्या कालखंडात आपण सगळे सध्या वावरत आहोत," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.