Marathi News> भारत
Advertisement

'मोदींचा 11 वर्षांचा काळ म्हणजे वाया गेलेला कालखंड', UBT चा हल्लाबोल; म्हणाले, 'पाकिस्तानच्या मुनीरने...'

Diplomatic Setback for India: "प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारत-पाक युद्धात हस्तक्षेप केला काय? प्रेसिडंट ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतर ‘नरेंदर’ मोदी झुकले काय?"

'मोदींचा 11 वर्षांचा काळ म्हणजे वाया गेलेला कालखंड',  UBT चा हल्लाबोल; म्हणाले, 'पाकिस्तानच्या मुनीरने...'

Diplomatic Setback for India: "मोदी यांच्या पंतप्रधानपदास 11 वर्षे झाली याबद्दल त्यांच्या भक्तांत खुशीचा माहोल असायला हवा. हे भक्त मंडळ हीच मोदींची खरी ताकद आहे. गेल्या 11 वर्षांत संधी मिळूनही मोदी यांना देशासाठी विशेष काहीच करणे जमले नाही. हा त्यांचा 11 वर्षांचा काळ म्हणजे वाया गेलेला कालखंड आहे," अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. "पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात ही भावना अधिक तीक्र झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चे नक्की फलित काय? हे मोदींचे भक्तदेखील सांगू शकणार नाहीत. 11 वर्षांत पंतप्रधान मोदी भारताच्या दुश्मनांच्या नांग्या ठेचतील, पाकिस्तानला तर कायमचे जमिनीत गाडतील असे वाटले होते. प्रत्यक्षात चीनच्या मदतीने पाकिस्तान जास्तच शिरजोरी करू लागला," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.

‘गरज सरो आणि वैद्य मरो’ हेच मोदींनी केले

"पाकिस्तानचे कश्मीर खोऱ्यांतील हल्ल्यांचे प्रमाण वाढले व पहलगामवरील हल्ला म्हणजे निर्घृण, अमानुष होता. भारताने पाकिस्तानवर हल्ले करून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. सैन्य जोरात असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष प्रेसिडंट ट्रम्प साहेबांनी भारतीय सैन्याचा अवसानघात केला. ट्रम्प साहेबांनी मोदी यांना धमकी देऊन युद्ध थांबविण्यास सांगितले व भारताच्या पंतप्रधानांनी युद्ध थांबवून शरणागती पत्करली हा काही मुत्सद्दीपणा नाही. तरीही जगभ्रमण करून परतलेल्या खासदारांना मोदींचा मुत्सद्दीपणा दिसत असेल व मोदी यांच्या माघारीच्या (सरेंडर) कृतीस मुत्सद्दीपणा ठरवून जगातून या मुत्सद्दीपणाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे ते जाहीर करीत असतील तर ही काही देशभावना असू शकत नाही. पहलगाम हल्ला व त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने संपूर्ण देश, सर्व राजकीय पक्ष एकवटून पंतप्रधान मोदींच्या मागे उभे राहिले हे चित्र चांगलेच आहे, पण नेहमीप्रमाणेच ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ हेच मोदींनी केले. मोदी यांनी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या नावाने बोटे मोडायला सुरुवात केली. प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारत-पाक युद्धात हस्तक्षेप केला काय? प्रेसिडंट ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतर ‘नरेंदर’ मोदी झुकले काय? या ज्वलंत प्रश्नाचे उत्तर न देणारे पंतप्रधान जगात भारी किंवा मुत्सद्दी कसे?" असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

भारताचे परराष्ट्र धोरण, मुत्सद्दीपणा अपयशी ठरल्याचे लक्षण

"आता तर नवेच संकट समोर आले आहे. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे हे अमेरिकेने मागेच मान्य केले आहे. अल कायदाचा लादेन पाकिस्तानच्याच आश्रयाला होता व पाकिस्तानात घुसून अमेरिकन कमांडोजनी लादेनला मारले आणि पाताळात गाडले. लादेनला पाकिस्तानी सैन्य व आयएसआयचे संरक्षण होते. मात्र असे असूनही त्याच पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखाला अमेरिकेच्या ‘आर्मी डे’साठी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेने बोलावल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला जगात एकटे पाडण्यासाठी भारत जंग जंग पछाडत असताना पाकिस्तानचा लष्कर प्रमुख सय्यद असीम मुनीर याने अमेरिकेच्या ‘आर्मी डे’ला प्रमुख पाहुणा म्हणून मानवंदना घेणे हे भारताचे परराष्ट्र धोरण, मुत्सद्दीपणा अपयशी ठरल्याचे लक्षण आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

भारतीय सैनिकांच्या शौर्याचा अपमान

"एका बाजूने पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभरात पाठवून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा करू पाहतात व त्याच वेळी अमेरिका पाकिस्तानी लष्कर प्रमुखासाठी पायघड्या घालते. अमेरिकेच्या मनात भारताविषयी नक्की काय भावना आहेत व मुनीर प्रकरणात भारताने अद्यापि नाराजी का व्यक्त केलेली नाही? भारताच्या भूमिकेला छेद देणारे विधान अमेरिकन लष्कराचे जनरल मायकल कुरिला यांनी केले. ‘पाकिस्तान दहशतवादविरोधी लढ्यात सक्रिय आहे,’ असे प्रमाणपत्रच जनरल मायकल कुरिला यांनी द्यावे, हे जरा अतीच झाले. तेवढ्यावरच कुरिला थांबले नाहीत. आम्ही पाकिस्तानशी संबंध ठेवणारच,’ असेही अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांनी सांगितले व असे सांगितल्याबद्दल पंतप्रधान मोदी किंवा भारताला काय वाटेल याची पर्वा त्यांनी केली नाही. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनीर हा सातत्याने भारतविरोधी जहर ओकत असतो. भारतावर हल्ला करणारे दहशतवादी म्हणजे स्वातंत्र्य सैनिक असल्याचे हा जनरल मुनीर मानतो व अमेरिका याच मुनीरला मानवंदना देऊन दहशतवादाबाबत त्याच्याशी चर्चा करणार आहे. 26 हिंदू महिलांचे कुंकू पुसण्यास मदत करणारा हा मुनीर अमेरिकेचा सरकारी पाहुणा बनतो. पंतप्रधान मोदी त्यावर मौन बाळगतात व भारतीय राजकारणी या मौनव्रताबद्दल मोदी यांना जगातले सर्वश्रेष्ठ ‘धोरणी’, ‘दूरदृष्टीचे’ वगैरे ठरवून भारतीय सैनिकांच्या शौर्याचा अपमान करतात," असा उल्लेख लेखात आहे.

...तर त्यात चूक काय?

"पाकिस्तानचा जनरल मुनीर हा हिंदूंच्या नावाने शिवीगाळ करतो. तोच मुनीर अमेरिकेचा सन्माननीय पाहुणा ठरतो. भाजपच्या हिंदुत्ववाद्यांना याची चीड, संताप येऊ नये? की या अंधभक्तांनी आता प्रेसिडंट ट्रम्प यांचीही आरती सुरू केली आहे? जनरल मुनीरला खास आमंत्रित करून अमेरिकेने भारताच्या जखमेवर मीठ चोळले आहे. भारत प्रदीर्घ काळ पाकिस्तानशी दहशतवादाच्या मुद्द्यावर लढत आहे. मुनीरचा गौरव म्हणजे भारताच्या दहशतवादाविरुद्ध लढ्यास कमजोर करण्याचा प्रयत्न आहे. मोदींच्या काळात हे घडत आहे. 11 वर्षांचा कालखंड वाया गेला असे कोणी म्हटले तर त्यात चूक काय?" असा सवाल लेखाच्या शेवटी करण्यात आला आहे.

Read More