Marathi News> भारत
Advertisement

Pahalgam Attack: दहशतवाद्यांसंदर्भात नवा घोळ उघड! ठाकरेंच्या सेनेचा सरकारला सवाल; म्हणाले, 'सुरक्षा...'

Pahalgam Terrorists Attack Shocking Details: "हल्ल्यानंतर 48 तासांच्या आत केंद्रीय सरकारने पहलगाम हल्ल्यात सामील असलेल्या तीन हल्लेखोर अतिरेक्यांचे ‘स्केच’ तडकाफडकी जाहीर केले होते."

Pahalgam Attack: दहशतवाद्यांसंदर्भात नवा घोळ उघड! ठाकरेंच्या सेनेचा सरकारला सवाल; म्हणाले, 'सुरक्षा...'

Pahalgam Terrorists Attack Shocking Details: पहलगाम हल्ल्यातील संशयित आरोपींचे स्केच कसे चुकले? असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे. ‘साप साप समजून भुई धोपटणे’ अशी एक म्हण मराठीमध्ये आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला व नृशंस हत्याकांडाबाबत गेले दोन महिने सरकारी तपासाची गतही या म्हणीप्रमाणेच झालेली दिसते. 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरण घाटीत अतिरेक्यांनी 25 पर्यटक व एका स्थानिक कश्मिरी तरुणाची गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्यानंतर या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटले. हल्ल्यानंतर 48 तासांच्या आत केंद्रीय सरकारने पहलगाम हल्ल्यात सामील असलेल्या तीन हल्लेखोर अतिरेक्यांचे ‘स्केच’ तडकाफडकी जाहीर केले होते. मोदी सरकारने अतिरेक्यांची कशी झटपट ओळख पटवली बघा, म्हणून सोशल मीडियावर लगेचच हे स्केचेस फॉरवर्ड करत सरकारचे गुणगानही खूप झाले. भारतासह जगभरातील प्रसारमाध्यमांत या तीन अतिरेक्यांचे हे स्केच झळकले. याच स्केचच्या आधारावर गेले दोन महिने पहलगामच्या या गुन्हेगारांचा शोध सुरू होता. मात्र स्केचमधील तीनपैकी एकाही अतिरेक्याचा पहलगामच्या हत्याकांडाशी संबंध नव्हता, अशी माहिती ‘एनआयए’ या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताज्या तपासातून पुढे आल्याने सरकारची मोठीच नाचक्की झाली आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

आता असत्य ठरले

"ज्या तीन अतिरेक्यांचे स्केच दोन महिन्यांपूर्वी जारी करण्यात आले होते, त्या तिघांचा पहलगामच्या हत्याकांडाशी कुठलाही संबंध नाही. जे स्केच यापूर्वी जारी करण्यात आले ते चुकीचे होते व खरे तीन हल्लेखोर हे वेगळेच आहेत, असे आता एनआयएनेच सांगितले आहे. आदील हुसेन थोकर हा कश्मिरी व अली बही ऊर्फ तल्हा आणि हाशीम मुसा ऊर्फ सुलेमान हे दोन पाकिस्तानी या तिघांची रेखाचित्रे हातात घेऊन तपास यंत्रणा गेले 60 दिवस त्यांचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी जंग जंग पछाडत होती. इतकेच काय, खुद्द परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अतिरेक्यांची ओळख पटवल्याची माहिती याच स्केचच्या आधारे दिली होती. ते सारेच आता असत्य ठरले," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

केवळ सरकारची नव्हे, देशाची नाचक्की

"पहलगाममध्ये क्रूर हत्याकांड घडवण्यात स्केचमधील कुणीही सामील नव्हता, हे स्पष्ट झाल्याने पहलगाम हल्ल्याची एकूणच चौकशी, तपासाची दिशा व दोन महिन्यांतील श्रम वाया गेले. पहलगाम हत्याकांडावरून अवघा देश प्रक्षुब्ध झाला असताना व या घटनेचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटणार हे स्पष्ट दिसत असतानाही सरकारने तपास व तपासातील अचूक तपशील जाहीर करण्याबाबत जी घिसाडघाई दाखवली, ती एका जबाबदार देशाला नक्कीच शोभणारी नाही. एनआयएने अलीकडेच परवेज अहमद जोथर व बशीर अहमद जोथर या दोन कश्मिरींना अटक केल्यानंतर पहलगामच्या खऱ्या हल्लेखोरांचा उलगडा झाला. तपासातून पुढे आलेल्या नव्या माहितीनुसार मूळ पाकिस्तानी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन अतिरेक्यांनी पहलगामचा हल्ला घडवला. यापैकी एकाचे नाव सुलेमान शाह असे आहे. पहलगामचेच रहिवासी असलेल्या परवेज व बशीर या दोन कश्मिरींनी या तिन्ही अतिरेक्यांना आपल्या घरात आश्रय देऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. अतिरेक्यांनी या दोघांना पैसे देऊन तोंड बंद ठेवण्यास सांगितले होते, अशी कबुली या दोघांनी आता दिली आहे. या दोघांच्याही चौकशीतून पहलगाम हल्ल्याचे आणखी सत्य व हल्ल्यातील पाकिस्तानचा हात यावर नक्कीच प्रकाश पडेल. मात्र, पहलगाममध्ये 26 निरपराधांचे भीषण हत्याकांड घडवणाऱ्या अतिरेक्यांचे दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आलेले स्केच सपशेल चुकीचे असेल तर ती केवळ सरकारची नव्हे, देशाची नाचक्की आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. 

दिशाभूल करण्याचा हेतू होता काय?

"आधी सांगितले ते अतिरेकी खरे नसून पहलगामचे खरे तीन पाकिस्तानी हल्लेखोर अतिरेकी वेगळे आहेत, हा एनआयएचा ताजा खुलासा अचंबित करणारा आहे. आपण किती त्वरेने काम करतोय, हे दाखवण्याच्या नादात सरकारने योग्य शहानिशा, खातरजमा न करता ज्या बेपर्वाईने चुकीचे स्केच जगभर झळकवले, ते चीड आणणारे आहे. पहलगामच्या खऱ्या गुन्हेगारांपर्यंत सरकार आता पोहोचत असेल तर उत्तमच. मात्र चुकीचे स्केच जाहीर करण्याची गंभीर चूक कुणामुळे झाली? त्यामागे सुरक्षा यंत्रणांची दिशाभूल करण्याचा हेतू होता काय? याचाही छडा आता लागायलाच हवा," अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.

Read More