Rajnath Singh Refuses To Sign SCO Document: शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत भारताने घेतलेल्या भूमिकेवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. "भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या किंगदाओ, मुक्काम पोस्ट चीन येथे आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत त्यांनी भाग घेतला. दहशतवादविरोधातील भारताची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली. या परिषदेत पाकिस्तानचे संरक्षणमंत्रीही उपस्थित होते. आपले संरक्षणमंत्री पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांना भेटले नाहीत, बोललेही नाहीत, त्यांच्याकडे पाहिलेही नाही अशा बातम्या गोदी मीडियाने केल्या. यामुळे काय फरक पडला? राजनाथ सिंह यांनी त्यांची भूमिका ठामपणे मांडली म्हणजे काय? दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी राजनाथ सिंह यांनी केली. राजनाथ सिंह हे सर्व कोड्यात बोलले. त्यांनी कोणत्याच देशाचे नाव घेतले नाही," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
"भारतातील दहशतवादाचा सूत्रधार पाकिस्तान आहे व त्या दहशतवादास पाठबळ देणारा चीन आहे. राजनाथ सिंह यांनी या दोन्ही राष्ट्रांचे नाव घेऊन खडे बोल सुनवायला हवे होते. या परिषदेत दहशतवादाविरुद्ध एक ठराव मंजूर केला, पण पाक पुरस्कृत सीमापार दहशतवादाविरोधात स्पष्ट भूमिका नसल्याने संयुक्त निवेदनावर सही करण्यास राजनाथ यांनी नकार दिला. याउलट पाकिस्तानातील बलुचिस्तानात सुरू असलेल्या हिंसाचारावर चीनच्या बैठकीत चर्चा झाली, पण पहलगामवर चिंता व्यक्त झाली नाही. शांघाय सहकार्य संघटनेचे हे कार्य योग्य नाही. शांघाय सहकार्य संघटना ही पाक पुरस्कृत दहशतवाद सहकार्य संघटना आहे काय? असा प्रश्न त्यामुळे पडतो," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. "जम्मू-कश्मीरातील पहलगामचा हल्ला जगाला हादरवणारा आहे. या दहशतवादाचा धिक्कार संपूर्ण जगाने केला, पण या परिषदेत त्यावर मौन बाळगणे याचा अर्थ यजमान देशाने दहशतवादाला पाठिंबा देण्यासारखे आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं चीनवर निशाणा साधताना म्हटलं आहे.
"बलुचिस्तानातील दहशतवादाचा निषेध शांघाय परिषदेत केला जातो, पण पहलगाम हल्ल्यास महत्त्व दिले जात नसेल तर हे असे का घडत आहे, याचा गांभीर्याने विचार भारताने करायला हवा. गेल्या 11 वर्षांत पंतप्रधान मोदी विशेष विमानाने जगभरात फिरत राहिले. चीनला गेले. चीनच्या राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत झोपाळ्यावर बसवले. सर्व खेळ केले ते स्वतःच्या चमकोगिरीसाठी, पण देशाच्या परराष्ट्र धोरणाने मात्र प्रत्येक बाबतीत मातीच खाल्ली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पंतप्रधानांचे पाणी जोखल्याचा हा परिणाम आहे. पहलगाम हल्ला झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी या हल्ल्याचा वापरही त्यांच्या राजकीय फायद्यासाठीच केला. 26 महिलांचे कुंकू पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी पुसले. त्यामुळे भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. पाकिस्तानवर आपल्या सैन्याने हवाई हल्ले केले व भारतीय सैन्य जोशात असतानाच अमेरिकेचे प्रेसिडंट ट्रम्प यांच्या दबावामुळे पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवून शरणागतीचा पांढरा झेंडाच फडकवला. त्यामुळे पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्र्यांच्या दहशतवादाविरोधी वल्गनांना आंतरराष्ट्रीय मंचावर महत्त्व उरले नाही," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
"भारताच्या सार्वभौमत्वाची ही शरणागती आहे. तरीही मोदी व त्यांचे लोक ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय विजयोत्सव साजरा करीत राहिले. जगात तो थट्टेचा विषय बनला. अशा सरकारच्या भूमिकांना आता जगात काय महत्त्व मिळणार? पाकिस्तान हा आपला लाडका देश असल्याचे प्रेसिडंट ट्रम्प यांनी जाहीर केले. चीनने पाकिस्तानला मांडीवरच घेतले. प्रेसिडंट ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘खाना’ दिला यावर भारताकडून निषेधाचा शब्द निघाला नाही. मग शांघायच्या सहकार्य परिषदेत आदळआपट करून काय साध्य होणार?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
"मुळात भारत दहशतवादाचा सगळ्यात मोठा शिकार आहे. दहशतवादाविरुद्धची लढाई भारत 70 वर्षांपासून लढत आहे. या लढाईस निर्णायक वळण मिळत असताना अमेरिकेच्या दबावाखाली ही लढाई थांबवणे योग्य नव्हते. इराण-इस्रायल युद्धात इराणसारख्या राष्ट्राने मध्ये लुडबुड करणाऱ्या अमेरिकेला चपराक मारली. अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणने सरळ हल्ले केले. रशिया-युक्रेन युद्धातही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा दबाव मान्य केला नाही. मग पंतप्रधान मोदींनाच प्रेसिडंट ट्रम्प यांचा दबाव मान्य करून दहशतवादाविरुद्धचे युद्ध थांबवावे असे का वाटले? या सगळ्या माघार प्रकरणाचा परिणाम भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेवर झाला. जग लढणाऱ्यांपुढे झुकते व तडजोडी करणाऱ्यांना ते किंमत देत नाही. मोदी वगैरे नेते भारतात मोठ्या गर्जना करतात, पण प्रेसिडंट ट्रम्प यांच्या समोर माघार घेतात. त्याचा परिणाम शांघायच्या सहकार्य परिषदेत दिसला. राजनाथ सिंह पाक, चीनवर बोलत राहिले, पण उपयोग काय?" असा सवाल लेखाच्या शेवटी ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.