Marathi News> भारत
Advertisement

मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री पत्नीला कार्यक्रमस्थळी विसरले! लक्षात आल्यावर 22 वाहनांच्या ताफ्याने U टर्न घेतला अन्...

Union Minister Leaves Wife Behind: एका दिवसाच्या धावत्या दौऱ्यादरम्यान काही स्थळांना भेटी आणि त्यानंतर कार्यक्रमांना हजेरी लावण्याचं या केंद्रीय मंत्र्यांचं नियोजन होतं.

मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री पत्नीला कार्यक्रमस्थळी विसरले! लक्षात आल्यावर 22 वाहनांच्या ताफ्याने U टर्न घेतला अन्...

Union Minister Leaves Wife Behind: एखादी गोष्ट विसरणे हा मानवी स्वभावाचा भाग आहे. अनेकजण आपल्या विसराळुपणामुळे टीकेचे धनी ठरतात. पावसाळ्यामध्ये तर छत्री रिक्षा, बसमध्ये विसरणं ही सामान्य बाब आहे. मात्र एखादी व्यक्ती आपल्या पत्नीलाच विसरली तर? बरं त्यातही ही व्यक्ती पंतप्रधानांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील असेल तर? असा प्रकार खरोखरच घडलाय तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्यासोबत घडलाय.

नेमकं घडलं काय?

एका अत्यंत विचित्र घटनेमुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहेत. शिवराज सिंह चौहान हे घाईघाईने एका ठिकाणावरुन निघाल्याने नकळत पत्नी साधना सिंह यांना जुनागडमध्येच सोडून त्यांच्या ताफ्यासह राजकोटला रवाना झाले. मात्र काही वेळाने शिवराज सिंह चौहान यांना आपण पत्नीला कार्यक्रमाच्या स्थळीच विसरलो आहोत असं लक्षात आलं. ताफ्यातील एकाही कारमध्ये पत्नी साधना नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांचा 22 कार्सचा ताफा पुन्हा जुनागडमधील पीनट रिसर्च सेंटरमध्ये परतले. या ठिकाणी साधना वेटिंग रूममध्ये वाट पाहत बसल्या होत्या. यासंदर्भातील माहिती एका खासदाराने दिल्याची माहिती 'एनडीटीव्ही'च्या वृत्तात दिली आहे. हा सारा किस्सा सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. 

एका दिवसाचा धावता दौरा

केंद्रीय कृषी मंत्री शनिवारी एक दिवसाच्या गुजरातच्या धार्मिक दौऱ्यावर होते. या भेटीदरम्यान त्यांनी जुनागडमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. नंतर ते पीनट रिसर्च सेंटरच्या शेतकऱ्यांशी आणि 'लखपती दीदी' योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार होते. त्यांना रात्री 8 वाजता राजकोटहून विमानाने प्रवास करायचा होता. त्यामुळे ते कार्यक्रम, भेटीगाठी लवकर संपवण्याच्या घाईत होते. संशोधन केंद्राच्या भेटीदरम्यान, त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत कामाचा आढावा घेतला, तर त्यांची पत्नी प्रतीक्षागृहात बसली होती. त्यानंतर शिवराज यांनी 'लखपती दीदी' योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. 

भाषणातही घाई असल्याचा उल्लेख

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ते वारंवार त्यांच्या घड्याळाकडे पाहत होते. आपल्या भाषणामध्येही शिवराज सिंह चौहान यांनी, “राजकोटचा रस्ता खराब आहे, पुढच्या वेळी मी आरामात येईन,” असं विधान करत आपल्याला घाई असल्याचं सूचित केलं. त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. त्यानंतर शिवराज सिंह चौहान ताफ्यासह जुनागढहून राजकोटच्या दिशेने घाईघाईत निघाले. दुसरीकडे, साधना गिरनारला भेट देऊन परत आल्या होत्या आणि प्रतीक्षागृहात शिवराज सिंह चौहान यांची वाट पाहत बसल्या होत्या.

fallbacks

पत्नीला फोन केला

सुमारे 10 मिनिटे प्रवास केल्यानंतर त्यांना समजले की साधना त्यांच्यासोबत अथवा ताफ्यातील एकाही कारमध्ये नाहीत. मग त्यांनी ताबडतोब पत्नीला फोन केला आणि ते ताफ्यासह परतले. पत्नीला पिकअप केल्यानंतर ते पत्नीसह राजकोटला रवाना झाले.

Read More