Bank EMI: जर तुम्ही बँकेचा हप्ता थकवला तर बँक वाले काय करतात? तुम्ही म्हणाल, जास्तीत जास्त घरातील सामान उचलतील. पण उत्तर प्रदेशातील झांसी येथील एका बँकेने तर सगळ्या मर्यादा ओलांडल्या. त्यांनी थकबाकीमुळे एका व्यक्तीची पत्नीलाच 'उचलल'. जेव्हा पतीने बँक व्यवस्थापनाशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं, "पैसे भरा, मगच तुमची बायको परत मिळेल." अशी घटना ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
एका खासगी मायक्रोफायनान्स बँकेने कथितपणे लोनच्या हप्त्याची थकबाकी वसूल करण्यासाठी एका महिलेला तब्बल 5 तास बंधक बनवून ठेवलं. ही घटना बम्हरौली गावातील आझाद नगर परिसरातील एका खासगी समूह कर्ज देणाऱ्या बँकेची आहे. येथील बाबई रोड, पूंछ येथील रहिवासी रविंद्र वर्मा यांची पत्नी पूजा वर्मा यांना सोमवारी दुपारी 12 वाजेपासून बँकेत कथितपणे जबरदस्तीने बसवून ठेवण्यात आलं.
जेव्हा रविंद्र बँकेत पोहोचले, तेव्हा त्यांना स्पष्ट उत्तर मिळालं, "पैसे द्या, तरच बायको मिळेल." रविंद्र यांनी खूप विनवण्या केल्या, पण बँक कर्मचाऱ्यांनी कोणतीही दया दाखवली नाही. अखेरीस हताश होऊन त्यांनी डायल 112 वर कॉल केला. पोलिस येताच बँक कर्मचाऱ्यांचे चेहरे पडले आणि घाईघाईने पूजा यांना सोडण्यात आलं.
पीडिता पूजा वर्मा यांनी मोंठ कोतवालीत दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, त्यांनी बँकेकडून 40 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. आतापर्यंत त्यांनी 11 हप्ते जमा केले आहेत. पण बँकेच्या रेकॉर्डनुसार फक्त 8 हप्तेच दाखवले जात आहेत. त्यांचा आरोप आहे की, बँकेचे एजंट कौशल आणि धर्मेंद्र यांनी त्यांच्या तीन हप्त्यांचे पैसे गिळले. पूजा यांनी सांगितलं की, मध्य प्रदेशातील टीकमगढ येथील बँकेचे सीओ संजय यादव सोमवारी त्यांच्या घरी आले आणि धमकावणाऱ्या पद्धतीने पैसे मागू लागले. नकार दिल्यावर त्यांना आणि त्यांच्या पतीला जबरदस्तीने बँकेत आणून तासन्तास बसवून ठेवलं.
बँक मॅनेजर अनुज कुमार (कानपूर देहात) यांनी यावर आपली बाजू मांडली आहे. पूजा यांनी गेल्या 7 महिन्यांपासून हप्ता भरलेला नाही, म्हणून त्यांना बँकेत बोलावलं गेलं. पूजा स्वतःच्या मर्जीने बँकेत बसल्या होत्या, असा दावा बॅंक मॅनेजरने केलाय.
सध्या पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. बँक कर्मचारी, एजंट आणि पीडित यांच्याकडून तपास सुरू आहे.कर्ज वसुलीच्या नावाखाली बंधक बनवणं हे कृत्य योग्य नाही, अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून समोर येतेय. या घटनेने बँकेच्या कार्यपद्धतीसोबतच कायदा व सुव्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.