Marathi News> भारत
Advertisement

दारु सोडण्याच्या वादातून त्याने भावाला अन् वहिनीला संपवलं; उत्तर प्रदेशमधील धक्कादायक घटना

Alcoholic Man Beats Couple To Death: पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल होईपर्यंत आरोपी घटनास्थळवरुन फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 2 टीम तयार केल्या आणि अवघ्या 6 तासांमध्ये त्याला अटक केली.

दारु सोडण्याच्या वादातून त्याने भावाला अन् वहिनीला संपवलं; उत्तर प्रदेशमधील धक्कादायक घटना

Alcoholic Man Beats Couple To Death: दारुच्या नशेत व्यक्ती काय करेल सांगता येत नाही. अनेकदा दारुच्या नशेत व्यक्तीकडून असं काही घडून जातं की नंतर पश्चाताप करुनही उपयोग नसतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये समोर आला आहे. येथील एका दारुड्या व्यक्तीने दारुच्या मुद्द्यावरुन झालेल्या वादातून आपल्या भावाची आणि वहिनीची हत्या केली.

नक्की घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव मोहनलाल असं आहे. मोहनलालने दारु सोडावी असं त्याच्या चुलत भावाचं आणि वहिनीचं मत होतं. याच मुद्द्यावरुन महोनलाल या दोघांशी भांडला. दारुचे दुष्परिणाम सांगण्यापासून ते एकमेकांना धमकावण्यापर्यंत हा वाद केला. बाचाबाची झाल्यानंतर दोघेही शांत झाले.  मात्र याच वादाचा राग मनात धरुन मोहनलालने या दोघांना धडा शिकवण्याचं ठरवलं. संतापलेल्या आरोपीने या दोघांना काठी आणि दांड्याने बेदम मारहाण केली. दोघांचेही वय 60 वर्षांहून अधिक असल्याने ते अचानक झालेल्या या हल्ल्याचा प्रतिकार करु शकले नाहीत. हा सर्व प्रकार कानपूर जिल्ह्यातील मंगलपूर येथील चिरखिरी गावात घडला आहे.

दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू

मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव रामप्रकाश शर्मा असं आहे. रामप्रकाश हे 70 वर्षांचे होते. तसेच रामप्रकाश यांच्या पत्नी मालतीदेवी यांचाही या हाणामारीमध्ये मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा रामप्रकाश यांचा चुलतभाऊ आहे. संपातलेल्या आरोपीने काठी आणि दांड्याने मारहाण करुन आपल्या चुलत भावाला आणि वहिनीला गंभीर जखमी केलं. उपचारापूर्वीच या दोघांचा मृत्यू झाला.

6 तासांमध्ये आरोपीला अटक

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला होता. पोलिसांनी 2 टीम तयार करुन आरोपीचा शोध सुरु केला. 6 तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला असून रागाच्याभरात आपण हे कृत्य केल्याचं त्याने म्हटलं आहे. आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात आलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांकडे सोपवले जाणार आहे.

Read More