Marathi News> भारत
Advertisement

Crime News : तब्बल 28 दिवस घरात लटकेल्या अवस्थेतच होता पतीचा मृतदेह; पत्नी घरी येताच...

Uttar Pradesh Crime News: किरकोळ कारणावरुन पतीबरोबर वाद झाल्याने पत्नी डिसेंबर महिन्यात दोन मुलांसहीत नणंदेच्या घरी निघून गेली होती. बुधवारी ही महिला घरी परतली तेव्हा तिला घरातलं दृश्य पाहून धक्काच बसला.

Crime News : तब्बल 28 दिवस घरात लटकेल्या अवस्थेतच होता पतीचा मृतदेह; पत्नी घरी येताच...

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कानपूरमधील (Kanpur) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील बिल्हैरमधील अमीनाबाद गावातील एका तरुणाने पत्नीबरोबर वाद झाल्यानंतर पत्नी व मुलं घर सोडून गेल्याने आत्महत्या केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. घरामध्येच गळफास लावून या तरुणाने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत असलं तरी मुख्य दाराला बाहेरुन कुलूप असल्याने याप्रकरणात काही घातपाताचा प्रकार आहे का अशीही शंका उपस्थित केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचा मृतदेह तब्बल 28 दिवस लटकलेल्या अवस्थेत होता.

पत्नी घरी परतली अन्...

बुधवारी या तरुणाची पत्नी घरी परतली तेव्हा तिला घरातील दृश्य पाहून धक्काच बसला. पतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाचा जवळजवळ सांगाडा (Skeleton) झाला होता. मृतदेहाचं मांस सडलं होतं आणि फार दुर्गंधी परसलेली. पोलिसांना यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयामध्ये पाठवला आहे.

पत्नीचा पोलिसांसमोर दावा; म्हणाली, "21 डिसेंबरपर्यंत..."

समोर आलेल्या माहितीनुसार, अरौल पोलीस स्थानकाच्या हद्दीमधील अमीनाबाद गावातील रहिवाशी असलेल्या सुदामा शर्माने पत्नी कीर्ति आणि दोन मुलांसहीत राहत होता. कुटुंबामधील संपत्तीचं वाटप झाल्यानंतर सुदामाने मूळ घरापासून काही अंतरावर घर बांधलं होतं. तिथेच हे चौकोनी कुटुंब राहत होते. पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी पतीबरोबर किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर ती मुलांसहीत आपल्या नणंदेकडे निघून गेली. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार 21 डिसेंबरपर्यंत ती रोज पतीशी फोनवरुन बोलायची. त्यानंतर कधीही पतीशी बोलणं झालं नाही, असंही कीर्तिने सांगितलं. 

पत्नीने व्यक्त केली शंका

बुधवारी कीर्ति आपल्या दोन्ही मुलांसहीत घरी आली असता घराच्या मुख्य दरवाजाला टाळं लावलं होतं. त्यानंतर तिने खिडकीतून घरात डोकावून पाहिलं असता तिला पतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिला. हा मृतदेह सडला होता आणि जवळजवळ सांगाड्याप्रमाणे दिसत होता. पत्नीने व्यक्त केलेल्या शंकेनुसार 21 डिसेंबर रोजी पतीने घराचा दरवाजा बाहेरुन बंद करुन कशातरी पद्धतीने घरात प्रवेश केला आणि आत्महत्या केली असावी.

पोलीस म्हणतात, मृतदेह 25 ते 30 दिवसांपूर्वीचा

घर गावापासून दूर असल्याने बरेच दिवस या बाजूला कोणीही न आल्याने सुदामासंदर्भातील माहिती कोणाला मिळाली नाही. पोलीस स्थानकाचे प्रमुख अरुण कुमार यांनी मृतदेह 25 ते 30 दिवसांहून अधिक दिवसांपासून लटकत असल्याचं प्रथमदर्शनी वाटत असल्याचं सांगितलं. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरु आहे असंही पोलिसांनी सांगितलं.

Read More