Uttarakhand Himachal Weather Update : मान्सूननं (Monsoon) संपूर्ण देश व्यापलेला असतानाच अतीव उत्तरेकडे असणारी आणि देशाच्या उत्तरेकडे पर्वतांच्या सौंदर्यानं नटलेली राज्य मात्र सध्या कोपलेल्या निसर्गाचा सामना करताना दिसत आहेत. मंगळवारीच उत्तराखंडच्या धराली गावातील (Uttarakhand Cloudburst) ढगफुटी आणि त्यानंतरच्या अतिप्रचंड पुरानंतर मैदानी भागांमध्येसुद्धा पावसामुळं हाहाकार माजल्याचं चित्र आहे. हवामान विभागानं उत्तराखंडमध्ये पुढील 48 तासांसाठी अतीदक्षतेचा इशारा जारी करत रेड अलर्ट दिला आहे.
हवामान विभागानं अतिदक्षतेचा इशारा देत वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तराखंडमध्ये नद्यांचा जलस्तर प्रचंड प्रमाणात वाढला असून, नदीपात्रांनी रौद्र रुप धारण केलं आहे. ज्यामुळं बहुतांश भागांना पुराचा धोका आहे. इतकंच नव्हे, तर अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका असल्यानं कैक गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांपर्यंत उत्तराखंडच्या मध्य पर्वतीय आणि मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाचा मारा वाढणार असून, त्याचे परिणाम अगदी उत्तर प्रदेशपर्यंत दिसून येणाप आहेत. पश्चिमी उत्तर प्रदेशात पावसाचा जोर वाढल्या कारणानं या भागातील नद्यांची पाणीपातळी वाढली असून, नागरिकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे.
तूतर्तास उत्तराखंडमधील रुद्रपुर, उधम सिंह नगर, चंपावत, नैनीताल, पिथौरागढ़, अल्मोड़ा, बागेश्वर, उत्तरकाशी आणि पौडी गढवाल हे अतिशय संवेदनशील भाग असल्याचं सांगत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि प्रशासनही या भागांवरील हवामान स्थिती आणि प्रत्येक लहानमोठ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार उत्तराखंडमध्ये पुढील 24 तासांत धोका आणखी वाढणार असून या राज्यातील बहुतांश तलाव आणि नद्यांचा जलस्तर त्यात आणखी भर टाकताना दिसणार आहे, तर हिमाचल प्रदेशातही अनेक नद्यांच्या पात्रांनी रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळणार आहे.
खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिमी उत्तर प्रदेश आणि लक्षद्वीपच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. राजस्थान, छत्तीसगढ, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात पावसाच्या मध्य सरींची हजेरी असेल तर, कर्नाटक, तामिळनाडू आणि गोव्यामध्येसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल.
हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांकडे वर्षभरच पर्यटकांचा ओघ असतो. मात्र सध्याच्या दिवसांमध्ये हवामानाची स्थिती पाहता या राज्यांच्या दिशेनं जाणं टाळा असा स्पष्ट इशारा यंत्रणांनी नागरिकांना दिला आहे. चारधाम (Chardham Yatra) यात्रेनिमित्त उत्तराखंडमध्ये मोठ्या संख्येनं परराज्यांतील पर्यटक आणि भाविक असून, सध्याच्या संकटसमयी त्यांना या ठिकाणी सर्व सोयीसुविधा पुरवत सुखरुप स्वगृही पाठवण्यासाठी तेथील राज्यशासन प्रयत्नशील असून, यंत्रणांना त्यांच्या कार्यात नागरिकांनीसुद्धा सहकार्य करावं असंच आवाहन सध्या करण्यात येत आहे. त्यामुळं किमान हे संकट टळेपर्यंत तरी पर्वतीय राज्यांच्या दिशेनं जाणं टाळा!
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात सध्या हवामानाची स्थिती काय आहे?
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात सध्या मान्सूनच्या अतिवृष्टीमुळे गंभीर हवामान परिस्थिती आहे. उत्तराखंडमध्ये ढगफुटी, पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे, तर हिमाचल प्रदेशातही नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे.
उत्तराखंडमध्ये कोणत्या भागांना सर्वाधिक धोका आहे?
उत्तराखंडमधील रुद्रपुर, उधम सिंह नगर, चंपावत, नैनीताल, पिथौरागढ़, अल्मोड़ा, बागेश्वर, उत्तरकाशी आणि पौडी गढवाल हे भाग अतिशय संवेदनशील आहेत.
हवामान विभागाने कोणता अंदाज वर्तवला आहे?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24-48 तासांत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचा धोका आहे. नद्यांचा जलस्तर वाढला असून, भूस्खलनाचा धोका कायम आहे.