Vice President Jagdeep Dhankhar Resigns: सोमवारी रात्री देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. सोमवारी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून तात्काळ प्रभावाने आपण पद सोडत आहोत, असं कळवलं. प्रकृतीसंबंधी समस्या आणि वैद्यकीय सल्ल्याचा संदर्भ देत धनखड यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. हा राजीनामा संविधानातील कलम 67 (अ) अंतर्गत कायदेशीर असून तो स्वीकारावा असं म्हटलं आहे. मात्र धनखड यांच्या राजीनाम्याबद्दल विरोधकांकडून वेगळीच शंका उपस्थित केली जात आहे. विशेष म्हणजे एका बड्या नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सूचक विधान केलं आहे.
जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात 'आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून, मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे.' राष्ट्रपतींचे सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल धनखड यांनी त्यांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल धनखड यांनी सर्वांचेच आभार मानत पद सोडत असल्याचं जाहीर केलं. असं असलं तरी विरोधकांनी मान्सून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेचे सभापती असलेल्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा देण्यावरुन शंका घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता हे पद भविष्याचा विचार करुन पंतप्रधान मोदींसाठी खाली करण्यात आल्याचं सूचक विधान महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने केलं आहे.
राज्यसभेचे खासदार तसेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनखड यांच्या राजीनाम्याबद्दल भाष्य केलं. "काल सिंदूर प्रकरणात खरगे बोलायला उभे राहीले. तेंव्हा लीडर ॲाफ द हाऊस सभापतींचे अधिकार आपल्याकडे घेतले. हा सभापतींचा अपमान आहे. पडद्यामागे काहीतरी गडबड सुरू आहे," असं भूवया उंचावणारं विधान राऊतांनी केलं. एवढ्यावरच न थांबता त्यांनी, "सप्टेंबरमध्ये काहीतरी उलथापालथ होऊ शकते. त्याचा पहिला बुरूज ढासळला. भाजपचा एक वरिष्ठ नेता 75 वर्ष पूर्ण करत आहे. ते उपराष्ट्रपती होऊ शकतात. संविधानिक पद त्यांच्या सोयीसाठी रिकामं केलं जात असावं असं मला वाटतं," असंही राऊत यांनी म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मोदी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत. त्यामुळेच राऊतांचं विधान हे मोदींकडे इशारा करणारं असल्याचं स्पष्ट आहे.
राऊत यांनी यापूर्वीही अशाप्रकारे मोदींच्या पंच्यात्तरीसंदर्भात विधानं केलेली आहेत. मोदी सप्टेंबर महिन्यामध्ये 17 तारखेला 75 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना, "खांद्यावर पंच्याहत्तरीची शाल पडली की थांबण्याचा विचार करावा," असं विधान केलं होतं. यावरूनही राऊत यांनी संघ आता मोदींना बाजूला सारण्याची तयारी करत असल्याचं म्हटलं होतं. आता उपराष्ट्रपती पदाची खुर्ची रिकामी झाल्यानंतरही राऊतांनी सूचकपणे मोदींच्या पंच्याहत्तरीबद्दल सूचक विधान केलंय.