UNHRC Ins Vs Pak : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारे मतभेद, सीमावाद काही केल्या शमण्याचं नाव घेत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही हेच चित्र पाहायला मिळत आहे. जिनिव्हा इथं सुरु असणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या मनवाधिकार परिषदेच्या 58 व्या सत्र बैठकीमध्येही हा दुरावा अधोरेखित झाला. जिथं, भारताच्या वतीनं पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारण्यात आलं.
पाकिस्तान हे एक अपयशी राष्ट्र असून, त्यांना देश चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून रहावं लागतं अशा तिखट शब्दांत भारतानं पाकचा समाचार घेतला. भारतीय मुत्सद्दी (Indian Diplomat) क्षितीज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्वं करताना पाकिस्तानचा उल्लेख करत बोचऱ्या शब्दांत आपली मतं मांडली. लष्कराच्या इशाऱ्यावर बनावट गोष्टी आणि अफवा पसरवण्याचा आरोप यावेळी पाकिस्तानवर लावण्यात आला. पाकिस्तानचे कायदे मंत्री आजम नजीर तरार यांच्या जम्मू काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनासंदर्भातील वक्तव्यावर उत्तर देताना त्यांनी ही मतं मांडली.
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये पाकिस्तान हे एक अपयशी राष्ट्र असल्याचं म्हणत भारताच्या वतीनं कटू बोल सुनावण्यात आले. यादरम्यान, जम्मू काश्मीर आणि लडाख हे प्रांत भारताचा अविभाज्य भाग असून, आता पाकिस्ताननंही ही बाब लक्षात घ्यावी आणि त्यांनी जम्मू काश्मीरबबात खोटं बोलणं थांबवावं अशा शब्दांत त्यागी यांनी शेजारी राष्ट्राची कानउघडणी केली.
#WATCH | Geneva: At the 7th Meeting - 58th Session of Human Rights Council, Indian Diplomat Kshitij Tyagi says, "India is exercising its right of reply in response to the baseless and malicious references made by Pakistan. It is regrettable to see Pakistan's so-called leaders and… pic.twitter.com/7Bg5j8jZJX
— ANI (@ANI) February 26, 2025
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा वापर करत भारतविरोधी वक्तव्य करत असून, हे राष्ट्र देशांतर्गत संटकांचा सामना करण्यात, त्यावर मात करण्यात मात्र अपयशी ठरलं आहे. एक देश म्हणून जिथं मानवाधिकांराची पायमल्ली होतेय, अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत अशा स्थितीमध्ये पाकिस्तान इतरांविषयी काहीच बोलू शकत नाही. भारताविषयी गरज नसलेलं वेड सातत्यानं दाखवण्यापेक्षा पाकिस्ताननं देशात आपल्या नागरिकांना योग्य शासन आणि न्यायव्यवस्था देण्यावर लक्ष केंद्रित करावं. इथं भारतात कायम लोकशाही, प्रगती आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेला केंद्रस्थानी ठेवलं जात असून, पाकिस्तानं या गोष्टी शिकण्याची गरज आहे', या शब्दांत त्यागी यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडत पाकिस्तानवर ताशेरे ओढले.