Crime News : सकाळी प्रेयसीसोबत कोर्टात जाऊन त्याने लव्ह मॅरेज केलं. पण त्याच रात्री प्रियकराने घरी आल्यावर आत्महत्या केली. या घटनेनंतर कोलार जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. प्रियकर आणि प्रेयसीने लग्न केल्यानंतर घरात सर्वजण आनंदी होते. घरात उत्सवाचं वातावरण होतं. जोडप्याने नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. पण ही नवीन सुरुवात सकाळी सुरु झाली आणि रात्री संपुष्टात आली. असं नेमकं काय झालं की तरुणाने लग्नाच्या काही तासांमध्ये आपलं आयुष्य संपवलं.
हरीश बाबू असं या तरुणाचं नाव आहे. तो कोलार शहरातील रहिवासी होता. हरीशने प्रियसीसोबत सकाळी कोर्टात जाऊन लग्न केलं. लग्नाच्या दिवशी सर्व काही ठीक होते. तो कोणतेही चुकीचे पाऊल उचलेल याबद्दल कोणालाही शंकाही आली नाही. पण त्याच रात्री हरीशने घरी आल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर केवळ कुटुंबालाच नव्हं तर संपूर्ण शहरात दुःख पसरलं. हरीशने त्याच्या लग्नासाठी तीन दिवसांची सुट्टी घेतली होती. तो आनंदी दिसत होता. पण लग्नानंतर जे घडलं ते सर्वांना हादरवून टाकणारे होतं. लग्नाच्या रात्री त्याने आत्महत्या केली असे काय घडले हे कुटुंब आणि नातेवाईकांना अजूनही समजण्यापलिकडलं होतं.
पोलीस तपासात असे दिसून आलं की सुरुवातीला हरीश या लग्नासाठी तयार नव्हता. त्याने लग्न करण्यासही नकार दिला होता. पण मुलीच्या कुटुंबाने त्याच्यावर दबाव आणला आणि शेवटी हरीश कोर्टात लग्न करण्यास तयार झाला. आता प्रश्न असा आहे की, त्याने हे लग्न मनापासून केलं की फक्त समाज आणि नातेवाईकांच्या भीतीपोटी केलं याचा तपास पोलीस घेत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, हरीशने आत्महत्या करण्यापूर्वी दारू प्यायली होती. दारूच्या नशेत त्याच्या मनात नकारात्मक विचार आले आणि त्याने हे भयानक पाऊल उचलले असा पोलिसांना संशय आला आहे. पण, अद्याप याची पूर्ण पुष्टी झालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. म्हणूनच आता मुलीचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांची चौकशी केली जात आहे. लग्नानंतर काही वाद झाला होता का की हरीश इतर काही कारणामुळे मानसिक तणावाखाली होता हे पोलीस शोध घेत आहेत.