Karnataka Robbery Case: अनेकदा काही चित्रपटांमध्ये असे प्रसंग दाखवले जातात की, ते पाहता प्रत्यक्ष आयुष्यातही असं काही घडत असेल का? असाच प्रश्न पडतो. इतक्यातच काही घटना घडतात आणि त्यापुढं थरारपटांची कथानकंसुद्धा फिकी पडतात. अशीच काहीशी घटना कर्नाटकच्या कलबुर्गी इथं घडली असून, त्यातील एक गोष्ट 'दृश्यम' चित्रपटातील 'हॉटेलमधील पावभाजी'च्या सीनलाही मागे टाकणारा आहे.
प्राथमिक माहितीनुसार कलबुर्गी इथं दिवसाढवळ्या एक मोठा दरोडा पडला आणि अखेर पोलिसांच्या हाती असा पुरावा लागला, ज्यामुळं चोरांच्या लहानशा चुकीमुळं चोर पकडले गेले. जिथं 30 रुपयांच्या पावभाजीमुळं 3 कोटी रुपये चोरणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं.
11 जुलै रोजी चार मुखवटा घातलेल्या माणसांनी एका दागिन्यांच्या दुकानात घुसखोरी केली आणि त्यांनी दुकाना मालक मार्थुला मलिक यांना दोरीनं बांधलं. चोरांनी लगेचच दुकानातून 3 किलो सोनं, चांदी आणि काही रोकड चोरली. चोरांनी शहराच्या अगदी मध्यभागी असणाऱ्या या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकला आणि ते तिथून फरार झाले.
पुढं कसंबसं मालकानं या साऱ्यातून आपली सुटका केली आणि पोलिसांना तपासादरम्यान एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं. ज्यामध्ये घटनेच्या काही तास आधीच आरोपींनी जवळच्याच दुकानात पावभाजी खाल्ली होती. याचदरम्यान फारुख नावाच्या इसमानं तिथं 'फोन पे'नं 30 रुपये भरले होते. पोलिसांनी याच व्यवहाराची माहिती मिळवली आणि फारुखचा फोन ट्रेस केला. इथंच पोलिसांना मोठा पुरावा मिळाला.
अतिशय कमाल पद्धतीनं झालेल्या या तपासात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. अयोध्या प्रसाद चौहान (48), फारुख अहमद मलिक (40- राहणार बांगलादेश) आणि सुहैल शेख (30- राहणार मुंबई) यांना अटक केली. पोलिसांनी यांच्याकडून 2.865 किलो सोनं आणि 4.80 लाखांची रोकड जप्त केली.
पोलीस तपासानुसार, चोरी केल्यानंतर काही वेळातच चोरांनी ते वितळवून विकलं आणि मुंबई गाठली. इथं ते वेगवेगळ्या वाटांना निघून गेले. पोलिसांनी या तिघांवर पालत ठेवत अखेर त्यांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी अरबाज आणि साजिद अद्यापही फरार असून, या टोळक्यानं ज्या हत्यारांचा धाक दाखवत चोरी केली होती ती खरी हत्यारं नसून बंदुकीच्या आकाराची सिगरेट लायटर होती ज्याचा धाक दाखवूनच त्यांनी दुकानावर दरोडा टाकला होता.
सुरुवातीला दुकान मालक मार्थुला यांनी फक्त 805 ग्राम सोनं चोरीलाच केल्याचा दावा केला होता मात्र, पोलीस तपासातून उघड झालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी 3 किलो सोनं लांबवल्याची माहिती समोर आली. आता या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे हे हेरत आहेत.