Marathi News> भारत
Advertisement

सुजलेला चेहरा, काळे डाग! अभिनेत्री रन्या रावला कस्टडीत मारहाण? व्हायरल फोटोवर महिला समितीने केलं भाष्य

सोमवारी रात्री रन्या राव दुबईहून बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली असता सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना पकडली गेली.   

सुजलेला चेहरा, काळे डाग! अभिनेत्री रन्या रावला कस्टडीत मारहाण? व्हायरल फोटोवर महिला समितीने केलं भाष्य

अभिनेत्री रन्या रावला सोन्याची तस्करी करत असताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. बंगळुरुमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) रविवारी संध्याकाळी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली रन्याला अटक केली. दरम्यान अटकेनंतरचा तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तिचे सुजलेले डोळे आणि जखमा दिसत आहेत. यामुळे अटक झाल्यानंतर तिला मारहाण झाली का असे प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी औपचारिक तक्रार दाखल होईपर्यंत चौकशी केली जाऊ शकत नाही असं स्पष्ट केलं आहे.

रन्या राव ही वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. सोमवारी रात्री बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आल्यावर 14.2 किलो वजनाच्या 14.56 कोटी रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना तिला पकडण्यात आलं. ती सध्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) कोठडीत आहे.

रन्या रावच्या चेहऱ्यावर जखमा असलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर चौधरी नागलक्ष्मी चौधरी यांनी कथित हल्ल्याचा निषेध केला. परंतु तक्रार प्राप्त होईपर्यंत आयोग कारवाई करू शकत नाही असं स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, "जर तिने आयुक्तांना पत्र लिहिलं किंवा मला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगणारं पत्र पाठवलं, तर आम्ही तिला मदत करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी, योग्य तपास करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहू. आयोग इतकंच करू शकतो. तिने विचारले नाही किंवा तक्रार दाखल केली नाही म्हणून मी अधिक भाष्य करू शकत नाही," ती म्हणाली.

"ज्याने कोणी ही मारहाण केली आहे, त्याने ती करायला नको होती, हे निश्चित आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. आपण तपास करु द्यायला हवा. कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पार पडेल. कोणालाही कोणावरही हल्ला करण्याचा अधिकार नाही, मग ती महिला असो किंवा इतर कोणीही, मी याच्या विरोधात आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे. 

2014 मधे मानिक्य चित्रपटातून पदार्पण करणारी रन्या राव 15 दिवसांत चौथ्यांदा दुबईला गेल्यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांच्या रडारखाली आली. वर्षभरात तिने दुबईचा 27 वेळा दौरा केला. सूत्रांच्या माहितीनुसार, पकडलं जाऊ नये म्हणून तिने काही सोने परिधान केले आणि बाकीचे कपड्यांमध्ये लपवले.

अटक केल्यानंतर, तपासकर्त्यांनी तिच्या घरावर छापा टाकला आणि 2 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. राव यांनी गुन्ह्यात सहभाग नाकारला आहे आणि सांगितले आहे की त्यांच्या सावत्र मुलीला तस्करीच्या आरोपाखाली अटक झाल्याच्या बातमीने धक्का बसला आहे. 

बुधवारी एका निवेदनात त्यांनी सांगितलं की, त्याच्या कारकिर्दीत एकही काळा डाग लागला नाही. चार महिन्यांपूर्वी मुलीचं लग्न झाल्यापासून आपण तिच्या संपर्कात नव्हतो. तिला आणि तिचा पती जतीन हुक्केरी यांच्या व्यावसायिक व्यवहाराबाबतही अनभिज्ञ असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Read More